कार्यालयाची वेळ बदलण्यास विरोध

By Admin | Updated: February 26, 2016 04:21 IST2016-02-26T04:21:04+5:302016-02-26T04:21:04+5:30

उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्याकरिता बृहन्मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात बोलून दाखवताच, त्याला

Opposition to change the office time | कार्यालयाची वेळ बदलण्यास विरोध

कार्यालयाची वेळ बदलण्यास विरोध

जान्हवी मोर्ये/प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्याकरिता बृहन्मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात बोलून दाखवताच, त्याला महिलावर्गाकडून कडाडून विरोध सुरू झाला आहे. रेल्वेमंत्री या नात्याने अतिरिक्त लोकल सोडून आणि महिला विशेष गाड्यांची संख्या वाढवून दिलासा देण्याऐवजी पोटापाण्याकरिता धावपळ करणाऱ्या महिलांचे वेळापत्रक बिघडवून टाकणारा प्रस्ताव प्रभू यांनी मांडल्याची भावना महिलांनी बोलून दाखवली.
अंबरनाथ-बदलापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे येथून मुंबईत फोर्ट, कुलाबा, नरिमन पॉइंटला नोकरीनिमित्त जाणाऱ्या महिलांची सकाळपासून बरीच ओढाताण होत असते. पोळीवाली बाई पाच-दहा मिनिटे उशिरा आली किंवा पाळणाघरातून मुलं घरी न्यायला विलंब झाला, तरी तिचा जीव वरखाली होतो. अशा वेळी कार्यालयीन वेळा बदलल्या तर तिचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकर असलेल्या रेल्वेमंत्र्यांनी अशी सूचना करावी, याचे महिलांना आश्चर्य वाटले आहे.
डोंबिवलीतील सुलभा कोरे बँकेत कामाला आहेत. त्या म्हणाल्या की, लवकर कामावर गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांची लवकर सुटी होईल, असे नाही. त्यामुळे गर्दी कमी होईल, असे मला वाटत नाही. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याखेरीज गर्दी कमी कशी होणार. महिला स्पेशल गाड्या पुरेशा नाहीत. महिलांचे डबेही जास्त नाहीत. अनेक महिलांना लॅपटॉप घेऊन आॅफिसला जावे लागते. जेवणाचा डबा, पर्स आणि लॅपटॉप घेऊन गर्दीतून प्रवास करणे महिलांसाठी जिकिरीचे ठरते.घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयात कामाला असलेल्या मयूरी कानडे यांनी सांगितले की, कार्यालयीन वेळ सकाळी उशिराची असेल तर महिलांना रात्री घरी परतण्यासदेखील उशीर होईल. त्यातून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस नसतात. त्यामुळे सूचना अव्यवहार्य आहे. डोंबिवलीच्या उज्ज्वला वैद्य या मुंबई महापालिकेत कामाला आहेत. डोंबिवली ते सीएसटी असा प्रवास महिला दररोज जीव मुठीत घेऊन करतात. गाड्यांची संख्या वाढली पाहिजे आणि वेळापत्रक पाळले गेले पाहिजे. दिखाव्याकरिता एक-दोन महिला विशेष सोडू नका. त्यांची संख्या लक्षणीय वाढवा.
लोअर परेल येथील खाजगी फर्ममध्ये कामाला असलेल्या अनिता खंडागळे यांनी सांगितले की, कामाची वेळ बदलली तरी कामाचे तास काही कमी होणार नाहीत. त्यामुळे त्या वेळी जाणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या असेलच. त्यामुळे विशिष्ट वेळेत गाड्यांना गर्दी राहणार. त्यामुळे गर्दी कमी होईल, असे वाटत नाही.

कल्याणमधील संपदा गोखले घाटकोपर येथील महापालिका शाळेत संगीत शिकवतात. त्यांनी सांगितले की, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने आम्हाला विविध शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण द्यावे लागते. संगीत विषयाच्या आठवड्याला ३६ तासिका होतात. या तासिका दोन्ही सत्रांत असतात. त्यामुळे कोणत्याही वेळेत प्रवास करायचा झाला तरी गाड्यांना गर्दी ही असतेच.

रेल्वेची गर्दी विभागली जाऊन अपघातांचे प्रमाण कमी होणार असेल तर कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव योग्य असेल, असे रश्मी वेल्लाळ म्हणाल्या. सुरेखा कुलकर्णी यांनाही वेळ बदलली तर डोंबिवलीत उतरताना फायदा होईल, असे वाटते. ही वेळ बदलताना सध्याच्या वेळेपेक्षा एक तास पुढे अथवा मागे असावी, असे अर्चना केतकर म्हणतात. मनाली दुर्वेंना नवीन कार्यालयीन वेळा ठरवताना ज्येष्ठांचा विचार व्हावा, असे वाटते.

Web Title: Opposition to change the office time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.