‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:03 IST2020-09-27T00:03:42+5:302020-09-27T00:03:53+5:30
संडे अँकर । डहाणूत प्रशासनाची मध्यस्थी; नागरिकांची मनधरणी करून योजनेचे महत्त्व पटवले

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विरोध
बोर्डी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्यात तालुक्यातील काही भागात स्थानिकांनी अंगणवाडी कर्मचाºयांना विरोध केल्याने तालुका प्रशासनाला मध्यस्थी करून समजूत काढावी लागली. त्यानंतर हा विरोध मावळल्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले. शहरांप्रमाणेच डहाणू तालुक्यातील काही भागात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला विरोध होऊ लागला आहे. या सर्वेक्षणाकरिता अंगणवाडी कर्मचारी गृहभेटीसाठी गेले असता घोलवड, लिलकपाडा आणि अन्य पाड्यांवर स्थानिकांनी नापसंती दर्शवली. त्यानंतर कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश न आल्याने त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर तहसीलदार राहुल सारंग, सहायक गटविकास अधिकारी राठोड आणि आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून विरोधाचे कारण समजून घेतले. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना आणि या मोहिमेविषयी नकारात्मक मॅसेज पसरल्याने अफवांना पीक आले आहे.
त्यामुळेच नागरिकांमध्ये विरोधी भावना निर्माण झाली आहे. कोरोनाच्या सर्व्हेक्षणासाठी शासन नागरिकांना दीड लाख रुपये देते, मात्र हा निधी शासकीय कर्मचारी वितरीत न करता स्वत: गडप करतात. त्यामुळे हा पैसा मिळायला हवा, अशी मागणी केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या या मोहिमेत सहभागी असलेले आरोग्य कर्मचारी घरोघर फिरत असल्याने त्यांच्यामार्फत हा रोग पसरण्याची भीती वाटते. तर तपासणी किटमुळेही विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता त्यांना वाटते. या वेळी कुटुंबियांच्या आजारांविषयीची माहिती द्यायला नकार दिला जातो. सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांना या प्रसंगाला रोजच सामोरे जावे लागत आहे.
जनजागृती होणे आवश्यक
पहिल्या टप्प्यात प्रशासनाला नागरिकांची मनधरणी करून विरोध मावळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीची आवश्यकता भासणार आहे. त्याद्वारे योजनेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे लागणार आहे.