ठाण्यात केवळ दोनच कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:14+5:302021-04-19T04:37:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका, म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात कोविड सेंटर ...

ठाण्यात केवळ दोनच कोविड सेंटर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका, म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असतांना शहरात केवळ पालिकेच्या माध्यमातून दोनच कोविड सेंटर सुरू असून उर्वरित दोन कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर कळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटर बंद आहेत. तर घोडबंदर भागातील बोरीवडे येथील कोविड सेंटरही बंद पडले आहे. त्यामुळे यावर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला की काय अशी शंका आता उपस्थित झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये १३०० बेड आहेत. तर पार्किंग प्लाझा येथे १ हजार ७५ बेड आहेत. सध्या हे दोन कोविड सेंटर सुरू आहेत. परंतु पार्किंग प्लाझा येथे प्राणवायूचा पुरवठा थांबल्याने येथील बेड रिकामे आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेत कळवा, मुंब्य्रातील रुग्णांना त्या त्या ठिकाणी उपचार मिळावेत या उद्देशाने कळव्यात ८०० च्या आसपास आणि मुंब्य्रातही ८०० च्या आसपास बेडचे रुग्णालय म्हाडाच्या जागेत उभारण्यात आले होते. तेथे साहित्य व डॉक्टर महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला होता. परंतु पहिली लाट ओसरत येत असतांनाच म्हाडाने या केंद्राचा खर्च पालिकेकडे मागितल्याने ही दोन्ही कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. ती आजही बंदच आहेत. मधल्या काळात मुंब्य्रातील कोविड सेंटरमधील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच घोडबंदर भागातील बोरीवडे येथेही खासगी संस्थेच्या सहभागातून कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु तेथे रुग्ण दाखल होण्याआधीच ते बंद झाले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याठिकाणीही पालिकेने चालविण्यासाठी केंद्र घेतले होते. यासाठी पालिकेने खर्च केला नसल्याचा दावा केला आहे. याठिकाणी ३०४ बेड उपलब्ध करण्यात आले होते.
दुसरीकडे व्होल्टास कंपनीच्या जागेवरही १ हजार ४ बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. यासाठी २३ कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु सुरुवातीला ऑक्सिजनचे कारण देत हे रुग्णालय सुरू करण्यात येत नसल्याचे पालिकेने सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात येथे कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने हे रुग्णालय आजही बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
------------------------------
ग्लोबल कोविड सेंटरवर आला ताण
दुसरीकडे बुश कंपनीच्या जागेवरही कोट्यवधींचा खर्च करून ४४० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. परंतु तेही अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. ही दोन्ही रुग्णालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून धूळखात आहेत. त्यामुळे पालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरवर आता अतिरिक्त ताण आला असून इतर कोविड सेंटर सुरू व्हावीत अशी ठाणेकरांची इच्छा आहे.