...तेव्हाच आयुक्तांचे डोळे उघडतील
By Admin | Updated: November 14, 2016 04:03 IST2016-11-14T04:03:09+5:302016-11-14T04:03:09+5:30
घरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण सुरूच आहे. यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील,

...तेव्हाच आयुक्तांचे डोळे उघडतील
डोंबिवली : घरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण सुरूच आहे. यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील, अशी संतप्त भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात चार दिवसांपासून रहिवाशांचे उपोषण सुरू आहे. आयुक्त ई. रवींद्रन हे शनिवारी डोंबिवलीत सूतिकागृहाच्या दौऱ्यासाठी आले होते. त्या वेळी ते भेट देऊन चर्चा करतील, अशी रहिवाशांना अपेक्षा होती. परंतु, त्यांनी पाठ दाखवल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शनिवारी सूतिकागृह व शास्त्रीनगर रुग्णालयांच्या दुरवस्थेची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत हेदेखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर खासदार व महापौरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी रवींद्रनही भेट देतील, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांना होती. परंतु, ते न फिरकले नाहीत.
आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत आहे, तरीही आयुक्त याची दखल घेत नाहीत, हे निषेधार्ह आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील का, असा सवाल रहिवासी संजय मांजरेकर यांनी केला आहे. आयुक्तांनी ठोस निर्णय घेऊन घरे द्यावीत, असा पवित्रा आमचा कायम आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक महेश पाटील यांनीही शुक्रवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रहिवाशांचे उपोषण कायम आहे. केडीएमसी व जागामालकाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, यासंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)