ठाण्यात फक्त ५२९ खड्डे
By Admin | Updated: July 6, 2016 02:38 IST2016-07-06T02:38:31+5:302016-07-06T02:38:31+5:30
कापूरबावडी आणि घोडबंदरच्या सर्व्हीस रोडवर खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, या वृत्ताची दखल घेऊन एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेने खड्डे बुजविण्यास

ठाण्यात फक्त ५२९ खड्डे
ठाणे : कापूरबावडी आणि घोडबंदरच्या सर्व्हीस रोडवर खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, या वृत्ताची दखल घेऊन एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेने खड्डे बुजविण्यास युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. ते बुजविण्यासाठी जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. परंतु, ठाण्यात यंदा रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा महापालिकेचा दावा मात्र पुरता फोल ठरला आहे.
ठाणे महापालिकेच्या स्टार ग्रेड या अॅपवर ५ जुलैपर्यंत ७०२ तक्रारी आल्या असून त्यातील ५२९ तक्रारी या खड्डयांच्या असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाने जोर धरल्याने शहराच्या विविध भागात त्यातही कापूरबावडी उड्डाणपुलावर आणि घोडबंदरच्या सर्व्हिस रोडवर खडडे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने ते बुजविण्याची कारवाई सुरु केली आहे. ते बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी यापूर्वीच प्रत्येकी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता ते बुजविण्याचे काम जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरु केले आहे. या तंत्रज्ञानात कोल्ड मिक्सचा वापर केला जात असून पालिका प्रथमच अशा तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या एक तासाच्या आतच रस्ता हा वाहतुकीसाठी खुला होत आहे.
दरम्यान ठाणे महापालिका हद्दीत यंदा पावसाळ्यात खड्डे नसतील, असा जो दावा पालिकेने केला होता. तो दावा मात्र पावसाने फोल ठरविला आहे. तिनहात नाका, नितिन कंपनी, कापूरबावडी, कळवानाका, कॅसलमील, टेंभीनाका आदींसह महापालिकेच्या १० प्रभाग समितीमध्ये रस्त्यांना खड्डे पडल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या, स्टार ग्रेड या अॅपवर ५ जुलैपर्यंत, ७०२ तक्रारी आल्या असून यामध्ये फेक तक्रारी १०० असून, चुकीच्या आणि इतर स्वरुपाच्या ७३ तक्रारी वगळता एकूण ५२९ तक्रारी या खड्यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ शहरात १० प्रभाग समितीअंतर्गत हे खड्डे पडले आहेत. यातूनच पालिकेचा दावा फोल ठरल्याचेच उघड होत आहे.
काही ठिकाणी जरी जेट पॅचरचा वापर केला जात असला तरी घोडबंदरच्या सर्व्हिस रोडवर खडी टाकून तात्पुरता मुलामा दिला जात आहे. तर कापूरबावडी उड्डाणपुलावर पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. त्यामुळे येथे पुन्हा खड्डे पडणार हे यातून स्पष्ट होत आहे.
रायलादेवी, वागळेही खड्ड्यांनी भरलेले
ठाणे महापालिका हद्दीतील १० प्रभाग समितीमधील नौपाडा या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्राईम लोकशनच्या समितीत खडड््यांच्या तब्बल १०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या खालोखाल रायलादेवीमध्ये ७९, वागळे ६५, लोकमान्यनगर सावरकरनगर ६२, माजिवडा-मानपाडामध्ये ४९ तक्रारी अॅपवर आल्या आहेत.
खड्डयांमुळे ट्रफिक ब्लॉक
शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याने तिनहातनाका, नितिन कंपनी, कॅसलमील, टेंभीनाका, विटावा आदींसह शहराच्या इतर भागातही खडड््यांचा त्रास वाहन चालकांना होत असून यामुळे ठिकठिकाणची वाहतूक सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस ब्लॉक होत आहे.