जन्म-मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाइन सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:08+5:302021-05-25T04:45:08+5:30
कल्याण : जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाइन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रास नोंदणी करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

जन्म-मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाइन सर्व्हर डाऊन
कल्याण : जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाइन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रास नोंदणी करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. तासनतास नागरिकांना रांगेत ताटळत उभे राहावे लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांकडून मृत्यूचे दाखले काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली जाते. कोविड काळात अनेकांचे आर्थिक दावे असतात. त्याच्या पूर्ततेसाठी तातडीने मृत्यू दाखल्याची आवश्यकता असते. त्याशिवाय पुढील प्रक्रियाच होत नाही. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात रांग लावली होती. त्याठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाइन नोंदणी होत नसल्याचे कारण सांगण्यात आले. ही साइट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याचे एका नागरिकाने सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून ऑनलाइन मृत्यू दाखल्याच्या नोंदणीकरिता ते महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. एक ज्येष्ठ नागरिक म्हणाला, आम्ही किती वेळ रांगेत उभे राहायचे, त्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून साइट बंद आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या आहे. तशी सूचना नागरी सुविधा केंद्रात लावली आहे. याविषयी सरकारकडे तक्रार केली आहे. साइट सुरू झाल्यावर नोंदणी सुरळीत होईल.
-----------------