डोंबिवलीत फडके रोडवरून एक टन प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:02 IST2019-09-26T00:02:18+5:302019-09-26T00:02:47+5:30
प्रभाग अधिकाऱ्यांची माहिती; फेरीवाले आणि दुकानदारांवर केली कारवाई

डोंबिवलीत फडके रोडवरून एक टन प्लास्टिक जप्त
डोंबिवली : राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने सुरुवातीला केलेली कारवाई नंतर थंड पडली. मात्र, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी फडके रोड परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदार, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांच्याकडून एक टन प्लास्टिक जप्त केल्याचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात २ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत कारवाईबरोबरच मंजुनाथ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांमध्ये प्लास्टिकविरोधात जागृती केली. यावेळी प्रमुख आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते. स्कायवॉकवर बसणारे फेरीवाले तर प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावरच फेकून देतात. यामुळे नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर, यासंदर्भात विक्रेते म्हणाले की, नागरिक वस्तू घेताना प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. पर्यावरण दक्षता मंचच्या समन्वयिका रूपाली शाईवाले यांनी प्लास्टिक वापरामुळे पुढील पिढीचे नुकसान होत असल्याचे सांगितले.
अपुºया मनुष्यबळामुळे अडचण
पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्लास्टिकबंदीची पूर्ण अंमलबजावणी करता येत नाही, असे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले. महापालिका हद्दीत १६ लाख नागरिकांसाठी केवळ सफाई विभागात १९०० कामगार काम करत असल्याचे ते म्हणाले.