ठाण्यात एक हजार परवडणारी घरे
By Admin | Updated: March 25, 2017 01:24 IST2017-03-25T01:24:33+5:302017-03-25T01:24:33+5:30
ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाण्यात एक हजार परवडणारी घरे
ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढील तीन महिन्यांत योजनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका या योजनेसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण करणार असून इच्छुकांचे आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे. वर्षभरात किमान एक हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाण्यात सर्वसामान्यांना घरे घेणे अशक्य झाले आहे. घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत प्रकल्पग्रस्त, झोपडीधारकांना प्राधान्यांनी घरे देण्यात येतात. प्रशासनाने किमान दोन लाख परवडणारी घरे बांधण्याचा निश्चय केला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध भूखंड, त्यावर किती इमारती व घरे बांधता येऊ शकतात, या योजनेत कोणाकोणाला सामावून घेता येऊ शकते आदी सर्व बाबींचा आराखडा तीन महिन्यांत सल्लागारांकरवी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे ५५० चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली घरे उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिका विकासकाला भूखंड देणार असून मागणीनुसार त्यांना घरे उपलब्ध करून द्यायची आहेत. जागा विनामूल्य मिळणार असल्याने केवळ बांधकाम खर्च विकासकाला करावा लागणार आहे.
त्यामुळे साहजिकच घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असणार आहेत. साधारण सहा लाखांपासून हा बांधकाम खर्च येणार असून सर्व व्यवहार बँकांमार्फत होणार आहेत. ठाण्यात घर घेण्यासाठी जानेवारी २०१७ पर्यंत ७ हजार अर्ज आॅनलाइन ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर आले आहेत. एप्रिलनंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार आहे. मात्र, ही योजना जास्तीतजास्त ठाणेकरांपर्यंत पोहोचावी व जास्तीतजास्त ठाणेकरांना हक्काचे परवडणारे घर मिळावे, यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. आॅफलाइन नोंदणी करून अर्जही स्वीकारण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाने बेतावडे, म्हातार्डी येथे सुमारे १ हजार घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. महासभेने त्याला आधीच मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)