जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात आणखी एक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 04:18 IST2020-08-09T04:18:36+5:302020-08-09T04:18:41+5:30
एकूण अटक आरोपींची संख्या चार

जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात आणखी एक अटकेत
कल्याण : रेल्वे स्थानकाजवळील नीलम गेस्टहाउसच्या गल्लीत गुन्हेगार जिग्नेश ठक्कर याची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी शार्पशूटरला नुकतीच ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुजरात येथून अटक केली होती. त्यानंतर, दोन जणांना शुक्रवारी, तर शनिवारी चेतन पटेल याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.
२९ जुलैला चेतन पटेल याच्यासोबत जिग्नेशचे भांडण झाले होते. या प्रकरणी चेतनने जिग्नेश याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जिग्नेश यानेही पटेलविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्याचा राग नन्नू शहा याला आला होता.
नन्नू व जिग्नेश हे बालपणापासून मित्र होते. एका खंडणीप्रकरणी जिग्नेश व नन्नू शहा हे सहआरोपी होते. नन्नू शहाच्या विरोधात १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी, हत्येचा प्रयत्न, हत्या यांसारखे गुन्हे आहेत. तर, जिग्नेशच्या विरोधातही गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान, जिग्नेशच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुजरात येथून जयपान याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अमजद पठाण व मुन्ना शहाला अटक केली आहे. या तिघांच्या अटकेनंतर शनिवारी चेतन याला अटक करण्यात आली आहे.
मात्र, प्रमुख आरोपी नन्नू शहा याला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्याच्या शोधात आहेत.