कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:46 AM2018-10-02T04:46:41+5:302018-10-02T04:47:09+5:30

तीन वर्षांतील आकडेवारी : दुचाकी, मोटार, रिक्षांची संख्या मोठी ; पार्किंगच्या सुविधेकडे महापालिकांचे दुर्लक्ष

One lakh vehicles in Kalyan RTO border | कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख वाहनांची भर

कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख वाहनांची भर

Next

मुरलीधर भवार

कल्याण : सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अपुरी पडत असल्याने दुचाकी, मोटारी आदी खाजगी वाहने खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. राज्य सरकारच्या मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कल्याण आरटीओ हद्दीत एक लाख नऊ हजार ४४३ वाहनांची नोंदणी झाली आहे.

कल्याण आरटीओ हद्दीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड हा परिसर येतो. या परिसरात दुचाकींची २०१५-१६ मध्ये ५० हजार ३७०, २०१६-१७ मध्ये ६८ हजार १२६, तर यंदाच्या वर्षी ७६ हजार १८४ इतकी नोंद झाली आहे. मोटारींची २०१५-१६ मध्ये आठ हजार ९२७, २०१६-१७ मध्ये १२ हजार १३३, तर यंदाच्या वर्षी १५ हजार ३२७ इतकी नोंदणी झाली आहे. रिक्षांची २०१५-१६ मध्ये तीन हजार १४४, २०१६-१७ मध्ये पाच हजार ६२४, तर यंदाच्या वर्षी १३ हजार ३४६ इतकी नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर स्कूलबस, रुग्णवाहिका, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर या वाहनांची नोंदणी झाली आहे. २०१५-१६ मध्ये ६५ हजार ७१९, २०१६-१७ मध्ये ९० हजार ७३५, तर यंदाच्या वर्षी ही संख्या एक लाख नऊ हजार ४४३ च्या घरात पोहोचली आहे. दोन वर्षांमध्ये वाहनांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी वाहननोंदणीपोटी आरटीओ कार्यालयाला २३७ कोटी रुपये, तर मागील तीन वर्षांत एकूण ६०९ कोटींचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

केडीएमसी हद्दीत पुरेसे वाहनतळ नसल्याने नागरिक त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. बेकायदा पार्किंगवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडे टोइंग व्हॅन कमी आहेत. वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगच्या सुविधेचा विचार महापालिकांकडून होत नाही. त्यामुळे नव्याने येत असलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. प्रत्येक शहरातील चौकांत व शहराच्या मुख्य रस्त्यांवर रिक्षास्टॅण्ड आहेत. मात्र, बहुतांश स्टॅण्ड अधिकृत नाहीत. रिक्षांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्थाही उपलब्ध नाही. डोंबिवलीत एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्ड रेल्वेस्थानकादरम्यान उभारला जाणार होता. मात्र, ते काम अद्याप सुरू झालेले नाही.

सार्वजनिक वाहतूकव्यवस्था दुबळी
च्केडीएमसीचा परिवहन उपक्रम आर्थिक कारणामुळे डबघाईला आला आहे. त्याचे खाजगीकरण होणार आहे.
च्एसटीच्या बस लांब पल्ल्यावर धावत असल्या, तरी कल्याण डेपोतून शहर व ग्रामीण परिसरातील बसफेऱ्या बंद पडल्या
आहेत. विठ्ठलवाडी-डोंबिवली-पुणे एसटी बस सुरू करून
बंद करण्यात आली.
च्उल्हासनगर महापालिकेची परिवहनसेवा खाजगी कंपनीला देऊनही बंद पडली आहे.
च्कल्याण हे मध्य रेल्वेवरील जंक्शन आहे. त्यामुळे येथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी गाड्यांचा दररोजच खोळंबा होतो. अन्य नगरपालिकांनी परिवहन सेवाच सुरू केलेली नाही.
च्सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे जाळे सक्षम नाही. त्यामुळे स्वत:च्या मालकीची वाहनखरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे.

Web Title: One lakh vehicles in Kalyan RTO border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.