भिवंडीत प्रेमप्रकरणातून एकाची निर्घृण हत्या
By Admin | Updated: April 20, 2017 04:11 IST2017-04-20T04:11:16+5:302017-04-20T04:11:16+5:30
प्रेमप्रकरणातून झालेला वाद मिटवूनही शांत न झालेल्या मुलीच्या नातेवाइकाने कट रचून अंजूर गावातील तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली

भिवंडीत प्रेमप्रकरणातून एकाची निर्घृण हत्या
भिवंडी : प्रेमप्रकरणातून झालेला वाद मिटवूनही शांत न झालेल्या मुलीच्या नातेवाइकाने कट रचून अंजूर गावातील तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही बुधवारी दुपारनंतर भिवंडी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रेम सतीश म्हात्रे (२३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते. त्याला गावात राहणारा मुलीचा नातेवाईक मंदार तरे याचा विरोध होता. दोघांमध्ये असलेले वाद महिनाभरापूर्वीच ग्रामस्थांनी बैठक घेऊन मिटवले होते. त्यामुळे प्रेमच्या मनात कोणाविषयी संशय नव्हता. याचा फायदा घेत मंदार याने मंगळवारी रात्री दापोडा येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ बीअर बारमध्ये प्रेमला बोलवले. तेथून मंदार तरे, प्रेम म्हात्रे आणि प्रेमचा चुलतभाऊ निलेश म्हात्रे हे तिघे स्वरूपनाथ कम्पाउंडमधील गोदामाच्या गच्चीवर गेले. तेथे मंदार याने जुने भांडण उकरून काढत वाद घातला आणि प्रेमवर वार केले. सुटका करून घेण्यासाठी तो पळत सुटला आणि काही अंतरावर तोल जाऊन पडल्याने मंदारने पुन्हा त्याच्यावर वार केले. तो मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर मंदार स्वत: नारपोली पोलीस ठाण्यात हजर झाला. तपासावेळी सीसीटीव्हीत निलेश म्हात्रेदेखील दिसल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. प्रेमने दुचाकी घेण्यासाठी घेतलेले आठ हजार परत न केल्याच्या वादातून त्याच्यावर हल्ला केल्याचे मंदारने जबानीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)