ओमी कलानी टीमला रिपाइं ऐक्याच्या युतीचे डोहाळे
By Admin | Updated: December 22, 2016 05:44 IST2016-12-22T05:44:51+5:302016-12-22T05:44:51+5:30
महापालिका निवडणुकीत रिपाइं ऐक्याच्या चर्चेने भाजपात अस्वस्थता असताना दुसरीकडे ओमी कलानी टीमलाही रिपाइं ऐक्याच्या

ओमी कलानी टीमला रिपाइं ऐक्याच्या युतीचे डोहाळे
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत रिपाइं ऐक्याच्या चर्चेने भाजपात अस्वस्थता असताना दुसरीकडे ओमी कलानी टीमलाही रिपाइं ऐक्याच्या युतीचे डोहाळे लागले आहेत. ओमी कलानी यांनी तसे संकेत दिले असून ऐक्याचे समन्वयक रमेश व्हटकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षासोबत युतीची प्रतिक्रिया यापूर्वीच दिली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीवर प्रश्नचिन्ह आहे. रिपाइं आठवले गटाची भाजपासोबत युती आहे. मात्र, ऐन निवडणुकीदरम्यान ऐक्याचे वारे वाहू लागले असून रिपाइंच्या गटातटांच्या स्थानिक नेत्यांनी बैठका घेणे सुरू केले आहे. जुने नेते किसन जाधव, रमाबाई भालेराव, शांताराम निकम, कवाडे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, वरिष्ठ नेते बी.बी. मोरे, आंबेडकर गटाचे शहर जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे आदींनी पुढाकार घेतला आहे. या ऐक्याच्या चर्चेत ऐक्यवादी रिपाइंच्या अध्यक्षीय मंडळातील सदस्य रमेश व्हटकर यांनी उडी घेतल्याने ऐक्याच्या चर्चेला उधाण आले.
रिपाइं ऐक्यवादी नेत्यांनी शिवसेना-भाजपासोबत युती नाही, असे संकेत दिल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसणार आहे. या प्रकाराने भाजपात अस्वस्थता पसरली. तर, ओमी कलानी टीममध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्यांनी ऐक्यवादी रिपाइंसोबत युतीचे संकेत दिले आहेत. शहर भाजपाची प्रतिमा मलिन असून बहुतांश स्थानिक नेत्यांवर व त्यांच्या नातेवाइकांवर अवैध बांधकामप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. महापालिका सत्तेत येण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांनी ओमी टीमच्या प्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रवेशाच्या नुसत्या चर्चेने भाजपात उभी फूट पडून एका गटाने पाठिंबा, तर दुसऱ्या गटाने विरोध केला होता. पक्षातील फूट थांबवण्यासाठी हा प्रवेश लांबवल्याची चर्चा शहरात होत आहे. (प्रतिनिधी)