पोलिसांच्या दक्षतेमुळे वृद्ध आईची झाली मुलाशी पुनर्भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:42 IST2020-02-14T00:41:55+5:302020-02-14T00:42:15+5:30
जुजबी माहितीच्या आधारे केलेले प्रयत्न यशस्वी : स्मृतिभ्रंश झाल्यामुळे पत्ता आणि फोन नंबरही सांगता येत नव्हते

पोलिसांच्या दक्षतेमुळे वृद्ध आईची झाली मुलाशी पुनर्भेट
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लुईसवाडी भागात कुसुम मधुकर ससाणे या ६० वर्षीय वृद्धेला स्मृतिभ्रंश झाल्यामुळे तिला पत्ता किंवा नातेवाइकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. केवळ कुर्ला-मुंबईत राहते, इतकीच जुजबी माहिती तिने दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी तिची आणि कल्याण इथे राहणारा तिचा मुलगा सचिन ससाणे यांची नुकतीच पुनर्भेट घडवून आणली. आपली आई पुन्हा मिळाल्याने सचिन यांना भावना अनावर झाल्या होत्या.
वागळे इस्टेट, लुईसवाडी भागात कुसुम ही वृद्ध महिला ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विमनस्क अवस्थेमध्ये फिरताना आढळली. तिला पत्ता आणि नातेवाइकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. ती केवळ कुर्ला येथे राहते इतकीच जुजबी माहिती सांगत होती. याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव, संजय आगवणे, राकेश घोसाळकर आणि सुनीता गीते आदींच्या पथकाने ठाणे तसेच कुर्ला आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यांना तिची माहिती दिली. परंतु, कोणतीच माहिती उपलब्ध होत नव्हती.
१० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पुन्हा तिला विश्वासात घेऊन तिच्या नातेवाइकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सासू गजराबाई ही कुर्ला मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करते, असे सांगितले. या माहितीच्या आधारे कुर्ला मार्केटमधील बीट अंमलदाराशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पती घाटकोपर येथे महानगरपालिकेत कामाला असल्याचेही तिने सांगितले. या माहितीच्या आधारे नाशिक, मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे येथील पाटबंधारे विभागातही या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तिचे पती मधुकर ससाणे मुंबई महापालिकेच्या पाणीखात्यात नोकरीला होते. त्यांचे निधन झाल्याची माहिती घाटकोपर येथील पाणीपुरवठा विभागातील एका महिलेने दिली. त्यावरून तिचा मुलगा सचिन ससाणे याचा मोबाइल क्रमांक मिळवून पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि मायलेकाची भेट घडवून आणली.
पोलिसांनी महिलेचा मुलगा सचिनकडे सविस्तर चौकशी केली असता, त्याची आई असून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून घरात काहीएक न सांगता निघून गेल्याचे उघडकीस आले.
आपण कल्याण येथे वास्तव्याला असून
२०१७ पासून आईची मानसिक स्थिती ठीक नाही. तिच्यावर एका खासगी रु ग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचेही सचिनने सांगितले.
कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये शोध घेऊनही ती मिळाली नव्हती. पोलिसांनी पुन्हा भेट घडवून आणल्यामुळे सचिनने आभार मानले.