जुनी अर्धवट; तरी नव्याची तयारी
By Admin | Updated: February 8, 2017 04:03 IST2017-02-08T04:03:45+5:302017-02-08T04:03:45+5:30
अंबरनाथमधील ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असतानाच नव्या योजनेच्या कामाची तयारी करण्यात येत आहे. ७८ कोटींचा खर्च करुनही

जुनी अर्धवट; तरी नव्याची तयारी
पंकज पाटील , अंबरनाथ
अंबरनाथमधील ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असतानाच नव्या योजनेच्या कामाची तयारी करण्यात येत आहे. ७८ कोटींचा खर्च करुनही विस्तारित पाणीपुरवठा योजना योग्यप्रकारे कार्यान्वीत झालेली नाही. कोहोजगाव येथे उभारलेल्या जलकुंभात दोन वर्षात एक थेंबही पाणी आलेले नाही. जुन्या योजनेचे काम अर्धवट असताना प्राधिकरण नव्या योजनेचे काम करण्याच्या तयारीत आहे. अंबरनाथच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य सरकारने ७८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेची जबाबदारी ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर सोपविण्यात आली.
शहरात सर्व पाणीपुरवठा प्राधिकरणामार्फत होत असल्याने या योजनेचे काम पूर्ण करुन घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. निविदा प्रक्रिया झाल्यावर ठराविक वेळेत हे काम पूर्ण करुन शहरातील वितरण व्यवस्था सुधारेल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र कामाची मुदत संपून वर्ष उलटले तरी या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे कामही अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आले आहे. कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नसल्याने कंत्राटदारही सर्व कामे करण्यास विलंब लावत आहे. प्रस्तावित पाण्याच्या टाकींचे काम करुन त्यातून पाणीपुरवठा योजना सुरू करणे अपेक्षित होते. मात्र अनेक ठिकाणच्या टाकीचे कामच पूर्ण झालेले नाही. तर ज्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे त्या टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच टाकलेली नाही. याचा प्रत्यय दोन वर्षापासून कोहोजगांव आणि चिंचपाडा परिसरातील नागरिकांना येत आहे. या परिसरात उभारण्यात आलेल्या टाकीचे काम हे रडतखडत पूर्ण करण्यात आले.
गणेशनगर टेकडीवरुन येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी काँक्रीट रस्त्यांची अडचण येत आहे. काँक्रीटचे रस्ते करण्या आधीच जीवन प्राधिकरणाला या परिसरातील जलवाहिन्या टाकून ठेवण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. मात्र वेळीच जलवाहिन्या न टाकल्याने आता काँक्रिटीकरणाचे काम झाल्यावर ते खोदण्याची परवानगी मागण्यात येत आहे. मात्र काँक्रिटीकरण खोदल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची असल्याने त्यासाठी वाढीव निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरीच मिळत नसल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले आहे.
कोहोजगाव ग्रामस्थ आणि परिसरतील वाढत्या नागरीकरणाला पाणीपुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधली आहे. या भागात नियमित पाण्याची समस्या भेडसावते. आठवड्यातून तीन ते चार दिवसच पाणी पुरवठा होतो. टाकीचे आणि जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याची मागणी तीन वर्षापासून नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, अर्चना चरण रसाळ करत आहेत.