अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:35 AM2021-01-10T01:35:01+5:302021-01-10T01:35:24+5:30

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

Okra growers in Shahapur in crisis due to untimely rains | अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
किन्हवली : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, बदललेल्या हवामानामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सतत दोन दिवस शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे ग्रामीण भागातील चरीव, अदिवली, आष्टे, मुसई, बर्डेपाडा, अस्नोली, अंदाड, लेणाडसह अनेक गावांतील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकंदरीत ढगाळ वातावरण, धुके व अवकाळी पाऊस याचा मोठा परिणाम उत्पादन व बाजारभावावर होणार आहे. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. भेंडीबरोबरच हरभरा, काकडी, मिरची व टोमॅटो या पिकांनाही पावसाचा फटका बसला असून अतिपावसामुळे बुरशी व इतर रोगांमुळे उत्पादनात घट होणार आहे.
लागवडीसाठी महागडे बी-बियाणे, खते, औषधे, मजूर यासाठी खूपच खर्च येतो. उत्पादनातून होणारा खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी आहेत. तालुक्यात अनेक बेरोजगार वीटभट्टीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकचा खर्च करून हा व्यवसाय करीत असताना सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे विटांचे खूप नुकसान झाले असून वीटभट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत आहेत.
 

भेंडीचे बियाणे चार ते पाच हजार रुपये किलो आहे. लागवडीसाठी इतरही खूपच खर्च येतो.  हा खर्च कसा भरुन काढायचा  असा  प्रश्न आहे. अवकाळी पावसाने साहजिकच उत्पादन कमी होणार असून उत्पन्नही कमी होणार आहे. त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार आहे.
    - तुषार पानसरे,     शेतकरी, चरीव
 

Web Title: Okra growers in Shahapur in crisis due to untimely rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे