अंबरनाथच्या एमआयडीसी रस्त्यावर ऑईल गळती; रस्त्यावरील ऑईलमुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात
By पंकज पाटील | Updated: April 24, 2023 18:05 IST2023-04-24T18:05:07+5:302023-04-24T18:05:34+5:30
अंबरनाथच्या एमआयडीसी रस्त्यावर ऑईल गळती झाली.

अंबरनाथच्या एमआयडीसी रस्त्यावर ऑईल गळती; रस्त्यावरील ऑईलमुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात
अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले. ही बाब स्थानिकांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला कळवताच अग्निशमन दलाने पाणी आणि फोमच्या सहाय्याने हा संपूर्ण रस्ता धुतला.
अंबरनाथ वडवली परिसरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शिवाजीनगर परिसरात आज एका वाहनातून ऑईल गळती झाली. हे ऑईल रस्त्याच्या मधोमध सांडल्यामुळे त्यावरून घसरून अनेक दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले. ही बाब मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला कळवली. यानंतर काही वेळातच अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत हा संपूर्ण रस्ता फोमच्या साहाय्याने धुवून काढला. त्यामुळे रस्त्यावरील ऑईल निघाले आणि काही वेळाने हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.