ठाणे - रेल्वेस्थानकांवरील प्रसूतीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या घटनांची दखल थेट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामार्फत घेण्यात आली आहे. त्यातून या स्थानकांवर होणाºया प्रसूतीच्या घटनांमध्ये कोणतेही अडथळे येत नसल्याने मध्य रेल्वेवरील स्थानकांवर असलेल्या मॅजिक दिल या संस्थेच्या वनरूपी क्लिनिकमार्फत कशा प्रकारे आणि नेमक्या काय सुविधा दिल्या जातात, याची माहिती घेण्यासाठी व क्लिनिकच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर यांनी रविवारी ठाणे रेल्वेस्थानकावरील क्लिनिकला रविवारी भेट दिली. देशातील इतर महत्त्वाच्या स्थानकांवर ही आरोग्यसेवा उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकाप्रमाणे इतर १९ रेल्वेस्थानकांवर वनरूपी क्लिनिक सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकावर झालेल्या यशस्वी प्रसूतीच्या घटनेची केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनी दखल घेतली. याचदरम्यान, काही खासदारांनीही मध्य रेल्वेवर असलेल्या वनरूपी क्लिनिकप्रमाणे आरोग्य सुविधा इतर रेल्वेस्थानकांवर उपलब्ध व्हावी, अशी मागणी केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर यांनी रविवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानकावरील क्लिनिकला भेट दिली.एक तासाच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील आरोग्यव्यवस्था आणि उपचारपद्धतींची इत्थंभूत माहिती घेतली. अशा प्रकारे आरोग्यसेवा इतर महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवरही उपलब्ध करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे डॉ. श्रीधर यांच्या बोलण्यात दिसून आले. याप्रसंगी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले, ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधक आर.के. मीना आणि ठाणे आरोग्य विभागाचे डॉ. गावडे आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांची ‘वनरूपी’ला भेट, ठाणे स्थानकातील दवाखान्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 01:44 IST