जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात अधिकाऱ्यांची अरेरावी
By Admin | Updated: February 29, 2016 01:44 IST2016-02-29T01:44:17+5:302016-02-29T01:44:17+5:30
पालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा संबंध सर्वच नागरिकांशी निगडित असतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांसोबत शांत आणि नम्रपणे बोलणे गरजेचे आहे.

जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात अधिकाऱ्यांची अरेरावी
अंबरनाथ : पालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा संबंध सर्वच नागरिकांशी निगडित असतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांसोबत शांत आणि नम्रपणे बोलणे गरजेचे आहे. मात्र, अंबरनाथ पालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील अधिकारी आणि ते काम करणारे लिपीक हे सर्वसामान्य नागरिकांसोबत अरेरावीची भाषा वापरत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे काम करण्यास विलंब लावत आहेत. त्यांच्या या उद्धटपणाचा अनुभव अंबरनाथच्या दोघा नागरिकांना आला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली आहे.
जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी करण्याची जबाबदारी ज्या कार्यालयात आहे, तेथील अधिकाऱ्यांचा उर्मटपणा पालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. एकीकडे सरकार सेवा हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्वरित माहिती आणि कागदपत्रे देण्याचा प्रयत्न करीत आहे. खासकरून जन्म आणि मृत्यूशी संबंधित दाखले एक ते दोन दिवसांत देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शासनाच्या या चांगल्या योजनेला हरताळ फासण्याचे काम या विभागातील अधिकारी करीत आहेत. या विभागाची जबाबदारी असलेले अशोक जाधव आणि त्यांना मदतीसाठी असलेले दीपक बोरसे हे कर्मचारी नागरिकांना सेवा देण्यास विलंब लावत आहेत. दाखले वेळेवर देणे तर सोडाच, एखादी माहिती विचारली तरी ती माहिती देण्यास ते टाळाटाळ करतात.
याचा प्रत्यय गुरुवारी चंद्रशेखर भुयार आणि गणेश गायकवाड या दोघा नागरिकांना आला. दहन दाखला घेण्यासाठी हे दोघे या कार्यालयात गेले असता त्यांनी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवली. मात्र, ती न चाळताच बोरसे यांनी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावरही त्यांनी कागदपत्रांची छाननी केली नाही. उलट, पोलीस अपघातांचा पंचनामा कार्यालयात बसून बनवतात. तो चालणार नाही, अशी भूमिका घेऊन पोलिसांच्या कामाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दाखला न देताच बोरसे यांनी आपले वरिष्ठ अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे त्यांना पाठविले. त्यांच्याकडे तर बोरसेंपेक्षाही अधिकच वाईट अनुभव त्यांना आला.
यासंदर्भात मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. तर, आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)