भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा धिंगाणा

By Admin | Updated: February 16, 2017 10:58 IST2017-02-16T02:01:08+5:302017-02-16T10:58:11+5:30

भाजपाच्या मीरा रोड येथील कार्यालयात प्रेमगीतांवर बेधुंद थिरकणाऱ्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने

Office of the office bearers | भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा धिंगाणा

भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा धिंगाणा

मीरा रोड : भाजपाच्या मीरा रोड येथील कार्यालयात प्रेमगीतांवर बेधुंद थिरकणाऱ्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्ताने हा धिंगाणा घातल्याचे मेसेज पसरले असले, तरी एका महिला पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नाचगाणी सुरू असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.
भाजपाची व्हॅलेंटाइन मस्ती, स्वत:ला शिस्तप्रिय व संस्कारी म्हणवणाऱ्या भाजपामध्ये महिलांना असे नाचवले जाते का? त्या नाचायला व मस्ती करायला येतात का? असे सवाल सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले.
मीरा रोडच्या कनकिया परिसरात भैरव रेसिडेन्सी इमारतीत कार्यालय आहे. हा व्हिडीओ हा त्याच कार्यालयातील आहे. त्यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी काजल सक्सेना, सोनिया नायक, प्रेमचंद, स्वाती भन्साळी, सौजन्या, राज पाठक यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता हे स्वत: या भागातील नगरसेवक असून त्यांनी मात्र हा कार्यक्रम व्हॅलेंटाइन डे चा नसल्याचे सांगितले. काही भाजपा कार्यालयांत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरे केले जातात. सोमवारी सोनिया नायक यांचा वाढदिवस साजरा केला. सर्व प्रमुख निघून गेल्यावर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात हा प्रकार केला. या प्रकरणी ५ ते ६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आम्ही घेतले आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे असे मेहता म्हणाले.
दरम्यान, वरिष्ठ नेते यावर कुठला निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Office of the office bearers