कॉलेजच्या अधिष्ठात्यासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:54 IST2019-07-09T23:53:58+5:302019-07-09T23:54:13+5:30
कोलशेत येथील डिपोओझ नेट कॉलेजला डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती.

कॉलेजच्या अधिष्ठात्यासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा
ठाणे : वेगवेगळ्या विद्यापीठाच्या नावाखाली प्रवेश दाखवून बी आणि डी फार्मसीच्या बनावट पदव्या दिल्याप्रकरणी कोलशेत येथील डिपोओझ नेट कॉलेजचा अधिष्ठाता पुरुषोत्तम तहीलरामानी आणि इतर संचालक मंडळाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवेशाच्या नावाखाली एका विद्यार्थ्याकडून दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रक्कम उकळले होते. दरम्यान, बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणाºया १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
कोलशेत येथील डिपोओझ नेट कॉलेजला डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती. २०१६ ते ८ जुलै २०१९ या तीन वर्षांच्या काळात राजस्थानचे ओपीजीएस विद्यापीठ आणि इतर विद्यापिठांच्या नावाने प्रवेश दाखवून ठाण्याच्या कोलशेत रोड मनोरमानगर येथील रहिवाशी उमाकांत यादव (२१) या तरुणाकडून दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रोकड घेण्यात आली. याशिवाय, इतरही सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेऊन त्यांना बनावट गुणपत्रिका देऊन त्यांचीही फसवणूक केली. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी नेट कॉलेजचे अधिष्ठाता तहिलरामानी तसेच इतर संचालक मंडळाविरुद्ध ८ जुलै २०१९ रोजी फसवणूक आणि बनावट प्रमाणपत्र बनविल्याचा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात यादव याने दाखल केला आहे.
तहीलरामानी याच्यासह १७ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने यापूर्वीच फसवणुकीच्या अन्य एका प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात त्याची जामीनावर सुटका झाली आहे. त्याला आता या गुन्ह्यातही लवकरच अटक केली जाणार असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. बनावट फार्मसी पदव्यांमुळे ठाण्यामध्ये मोठी खळबळ
उडाली होती.
नेमके काय आहे बनावट पदव्यांचे आधीचे प्रकरण?
ठाण्यातील ढोकाळी भागातील ‘दीप पॅरामेडिकल आॅर्गनायझेशन’ ही संस्था डी फार्मसीच्या बनावट प्रमाणपत्राची विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने तहिलरामानी याच्यासह आधी १३ जणांना अटक केली.
त्यानंतर याच चौकशीमध्ये कमलेश पटेल, जगदीश चौधरी, वजाराम चौधरी आणि चुनीलाल चौधरी या आणखी चौघांना ११ एप्रिल २०१९ रोजी अटक करण्यात आली. कापूरबावडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षा परिषद महाराष्ट्र, माध्यमिक शिक्षा परिषद उत्तरप्रदेश, माध्यमिक शिक्षा परिषद अजमेर, नवी दिल्ली या संस्थांच्या नावाची बनावट प्रमाणपत्रे आढळून आली. तसेच डी फार्मसीचे प्रशिक्षण न घेताही ताहिलरामानी यांच्याकडून मेडिकल स्टोअर चालू केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी संस्था प्रमुख ताहिलरामानी यालाही पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती.