हे हिंदुत्वाचे मिलावटराम; जनताच त्यांना जागा दाखवेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2023 22:25 IST2023-10-15T22:25:17+5:302023-10-15T22:25:37+5:30
ठाण्यात टेंभी नाका येथील देवीच्या आगमन मिरवणूकीच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह भाजप विरोधात एकत्र आलेल्या २१ पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली.

हे हिंदुत्वाचे मिलावटराम; जनताच त्यांना जागा दाखवेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे: २०१९ मध्ये केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसला जवळ त्यांनी केले. ज्यांनी बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली. काँग्रेसबरोबर सोबत केली. तेंव्हापासूनच त्यांना हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
ठाण्यात टेंभी नाका येथील देवीच्या आगमन मिरवणूकीच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह भाजप विरोधात एकत्र आलेल्या २१ पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी नेहमी बाळासाहेबांच्या विरोधात भूमीका घेतली. बाळासाहेबांवर खालच्या पातळीवरील टीका केली. त्यांच्या विचारांवर आणि कार्यपद्धतीवर आरोप केले. ज्या काँग्रेसला गाडा, असे बाळासाहेबांनीच म्हटले होते. त्याच काँग्रेसशी जेंव्हा सत्तेसाठी घरोबा केला. ज्यांना कवटाळण्याचे काम केले. तेंव्हापासूनच त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले. सर्व २१ पक्ष २०१४ आणि २०१९ मध्येही एकत्र आले होते.
खरेतर २०१९ मध्ये हिंदुत्वाच्या नावावर मतदारांनी मतदान केले होते. परंतू, आज अन्रात भेसळ केल्याप्रमाणे हे एकत्र आलेले २१ पक्ष म्हणजे हिंदुत्वाचे मिलावटराम आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनता हा बनावट मुखवटा फाडून टाकतील. जनताच अशा विरोधकांना जागा दाखविल. त्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना नव्हे तर रस्त्यावर उतरुन मदत करणाऱ्यांना जनता निवडून देते. त्यामुळेच आगामी २०२४ मध्ये या देशात नरेंद्र मोदी हेच मोठया मताधिक्याने पंतप्रधान होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.