कोरोना चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णसंख्याही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST2021-05-06T04:42:45+5:302021-05-06T04:42:45+5:30

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या ...

As the number of corona tests decreased, so did the number of patients | कोरोना चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णसंख्याही घटली

कोरोना चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णसंख्याही घटली

अजित मांडके

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत घटली आहे. परंतु, प्रत्यक्षात कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे मनपाच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी मनपाकडून दिवसाला १२ हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या. सध्या हीच संख्या पाच हजारांपर्यंत घटली आहे.

फेब्रुवारीअखेरपासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे ठाणे शहर व जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढले. मार्चअखेरपासून ते २५ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या काही प्रमाणात झपाट्याने वाढली. एप्रिलमध्ये रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. परंतु, एप्रिलच्या मध्यापासून कोरोना चाचण्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत गेल्याने आता रुग्णांची संख्याही घटली आहे. यापूर्वी मनपा आणि खासगी लॅबच्या माध्यमातून दिवसाला १० ते १२ हजार ॲण्टिजेन चाचण्या केल्या जात होत्या. सध्या ही संख्या चार ते पाच हजारांपर्यंत आली आहे. १० ते १२ हजार चाचण्या केल्यानंतर १,७०० ते १,८०० नवे रुग्ण रोज शहरात आढळत होते. परंतु, आता चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या ५०० ते ७०० च्या दरम्यान स्थिरावली आहे.

लॉकडाऊन जाहीर होताच भाजीविक्रेते, दुकानदार तसेच इतर नागरिकांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढली होती. आता त्यांची संख्याही कमी झाली आहे. परिणामी, मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरील संख्याही घटली आहे. एकूणच चाचणीसंख्या घटल्याने रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. रुग्णवाढीचा दर हा १ एप्रिलला ६.५५ टक्के इतका होता. तो आजही किंबहुना मागील काही दिवस ७.८६ टक्क्यांवर स्थिरावल्याचेही दिसत आहे.

तारीख - चाचणीसंख्या- रुग्णसंख्या- पॉझिटिव्हिटी दर

१ एप्रिल - ६४६३ - १४३२- ६.५५

८ एप्रिल - ७३५० - १८८३ - ६.६६

१५ एप्रिल - १०४५० - १५०५ -७.२५

२१ एप्रिल - १०६५० - १२९० - ७.४३

२८ एप्रिल - ५३५० - ७७० - ७.७२

१ मे - ५१२५ - ६८८ - ७.७९

२ मे - ४२२५ - ७५६ - ७.८४

३ मे - ५२२५ - ५१६ - ७. ८४

४ मे - ४७०३ - ५५२ - ७.८६

----------

आरटीपीसीआरचे अहवाल पॉझिटिव्ह

ठाण्यात ॲण्टिजेनपेक्षा आरटीपीसीआरचे अहवाल हे अत्यंत योग्य आणि बिनचूक येत असल्याने नागरिकांचा कल हा आरटीपीसीआर चाचणी करण्याकडे अधिक आहे. यातील ७० टक्के अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याचे दिसून येत आहे.

-----------

ॲण्टिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर पॉझिटिव्हचे प्रमाण किती

ॲण्टिजेन चाचणी करताना ती १०० टक्के योग्य येईल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाची ॲण्टिजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर डॉक्टर त्याला आरटीपीसीआर करण्याचा सल्ला देतात. त्यात त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह येतो. त्यामुळे डॉक्टर थेट आरटीपीसीआर करण्यास रुग्णांना सांगत आहेत. त्यामुळे दिवस वाचतात आणि चिंताही कमी होते. त्यातही ॲण्टिजेनचे अहवाल हे ३० ते ३५ टक्केच योग्य येत आहेत. तर, आरटीपीसीआरचे अहवाल हे खात्रीशीर असल्याने ते निगेटिव्ह आले तर रुग्णही निश्चिंत होतात.

-----------

ठाणे मनपाने कोणत्याही प्रकारे कोरोना चाचण्या कमी केलेल्या नाहीत. रुग्णसंख्या कमी झाल्यानेच चाचण्यांचे प्रमाणही काहीसे घटले आहे. म्हणून रुग्णांची संख्या कमी येत आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमची आजही दिवसाला १२ हजार कोरोना चाचणी करण्याची क्षमता आहे. परंतु, लॉकडाऊनच्या काळात भाजीविक्रेते, दुकानदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांनाही चाचणी बंधनकारक केल्याने कोरोना चाचण्याही जास्त प्रमाणात होत होत्या.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

-------------

Web Title: As the number of corona tests decreased, so did the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.