नुबैरशाह शेख ‘इंटरनॅशनल मास्टर’
By Admin | Updated: September 7, 2016 02:39 IST2016-09-07T02:39:33+5:302016-09-07T02:39:33+5:30
ठाण्याच्या १८ वर्षीय नुबैरशाह शेखने २३ व्या अबुधाबी आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड मास्टर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिसरा आणि अंतिम ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला

नुबैरशाह शेख ‘इंटरनॅशनल मास्टर’
ठाणे : ठाण्याच्या १८ वर्षीय नुबैरशाह शेखने २३ व्या अबुधाबी आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड मास्टर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिसरा आणि अंतिम ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला. यापूर्वी २४०० आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन पार केलेले असल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून त्याला ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब देऊन गौरवण्यात आले.
जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या परवानगीने संयुक्त अरब अमिरात बुद्धिबळ महासंघाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ३२ देशांतील ४६ ग्रॅण्ड मास्टर्स, ४१ इंटरनॅशनल मास्टर्स व १४ फिडे मास्टर्ससह एकूण १३७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा नऊ फेऱ्यांमध्ये खेळवण्यात आली. नुबैरशाहला (२४१५) आंतरराष्ट्रीय गुणांकनाप्रमाणे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ६२ वे मानांकन देण्यात आले होते. त्याने या स्पर्धेत चीनचा वांग झिनमू (२०९२), आपल्याच देशातील अनिरुद्ध देशपांडे (२२१५), रशियाचा इंटरनॅशनल मास्टर गोलुबोव सेवली (२४८१) व अर्मेनियाचा आघाडीचा ग्रॅण्ड मास्टर मेल्कुम्यान हरन्त (२६५०) यांना पराभवाचे धक्के दिले, तर युक्रेनचा ग्रॅण्ड मास्टर बोर्तनिक अलेक्झांडर (२५८८) व अर्मेनियाचा ग्रॅण्ड मास्टर तेरसहाकिन सॅमवेल (२६१३) यांना बरोबरीत रोखले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत नुबैरशाहला रशियाचा ग्रॅण्ड मास्टर सॅवचेन्को बोरिस (२६०३), युक्रेनचा ग्रॅण्ड मास्टर ओलेकसियन्को मिखायलो (२६१०) आणि भारताचा ग्रॅण्ड मास्टर वैभव सुरी (२५५६) याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याने या स्पर्धेतून नऊ सामन्यांतून चार विजय व दोन बरोबरी यांचे पाच गुण मिळवून २४९१ गुणांकनाची कामगिरी करून तिसरा ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला.
आंध्र प्रदेशमध्ये आॅक्टोबर २०१६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेतून जागतिक व आशियाई ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्यासाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)