आता ‘पिठलं-भाकर’बरोबर धान्यही विक्रीला
By Admin | Updated: April 25, 2016 03:01 IST2016-04-25T03:01:52+5:302016-04-25T03:01:52+5:30
दुष्काळग्रस्तांच्या ‘पिठलं-भाकर’च्या स्टॉलला ठाणेकरांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान्यही आठवडाभरात विक्रीसाठी येणार आहे.

आता ‘पिठलं-भाकर’बरोबर धान्यही विक्रीला
ठाणे : दुष्काळग्रस्तांच्या ‘पिठलं-भाकर’च्या स्टॉलला ठाणेकरांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान्यही आठवडाभरात विक्रीसाठी येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांच्या पुढाकाराने रविवारी हा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळाच्या सावटाखाली जगत असलेल्या कुटुंबीयांना पाऊस होईपर्यंत संसाराचा गाडा हाकण्यासाठी रोजगार मिळावा, या उद्देशाने कमलतार्इंनी दौण तालुक्यातील खुटबाव गावातील दोन कुटुंबीयांना शहराकडे आणले. ठाण्यात आठवडाभरापूर्वी त्यांनी गावदेवी मैदान येथे ‘पिठलं भाकर’चा स्टॉल उघडून दिला. आठवडाभरातच या स्टॉलवर शेकडोंच्या संख्येने गर्दी होऊ लागली. दुष्काळग्रस्त भागातील जास्तीतजास्त कुटुंबांनी येथे यावे, याकरिता गेला आठवडाभर कमलताई प्रयत्न करीत आहेत. मात्र, गाडीभाड्यालाही पैसे नसल्याने अनेक शेतकरी येण्यास तयार होत नाहीत. तसेच, माल संपेल की नाही, या धास्तीने शहराकडे येण्यासाठी काही जण घाबरत आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांचा माल आपणच ठाण्यात आणावा, यासाठी पंडित जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूड गावातील गावदेवी येथे भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र व्यापारी पेठ येथे शेंगदाणे आणि चिक्कीचा स्टॉल होता. येत्या आठवडाभराच्या आत तेथील शेतकऱ्यांचा माल ते ठाण्यात आणणार आहेत. यात कडधान्य, ज्वारी, तांदूळ यांचा समावेश असेल, असे जाधव यांनी सांगितले. ‘पिठलं-भाकर’ स्टॉलच्या बाजूला आठवडाभराच्या आत या धान्याचाही स्टॉल लागणार आहे. (प्रतिनिधी)