पंकज रोडेकर/हितेन नाईकठाणे /पालघररोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा निर्मितीनंतरही ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार असून पालघरमध्येच या योजनेचा कक्ष लवकर सुरू होणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० पदांना मंजुरी दिली आहे. यात ठाण्यातील ५ पदे पालघरात वर्ग करून उर्वरित पाच पदे नव्याने भरण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे ३१ जुलै २०१४ रोजी विभाजन झाले. त्या वेळी १ आॅगस्ट २०१४ पासून पालघर, वसई, डहाणू, तलासरी,जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश करून पालघर जिल्हा निर्माण क रण्यात आला आहे. त्याचे मुख्यालय पालघर येथे ठेवले आहे. जिल्हानिर्मितीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही रोजगार हमी योजना कक्ष जिल्ह्यात नसल्याने नागरिकांना या कामासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. याचदरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पदसंख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, नवनिर्मित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोजगार हमी योजना कक्षाच्या पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, ठाण्यातील ५ आणि पालघरातील नवीन पाच अशा १० पदांचा समावेश आहे. पालघरमध्ये या कक्षासाठी उपजिल्हाधिकारी, कनिष्ठ अभियंता (सा.बां.वि.), सहायक लेखाधिकारी, अव्वल कारकून, लिपीक-टंकलेखक या नव्या पदांसह उपअभियंता (जलसंपदा विभाग), नायब तहसीलदार, लघु टंकलेखक, वाहनचालक आणि शिपाई अशी मंजूर पदे आहेत. या योजनेच्या कामासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना कार्यालयप्रमुख म्हणून घोषित केले आहे.तसेच त्यांना आस्थापनाविषयी बाबी हाताळण्यासाठी ‘आहरण व संवितरण अधिकारी’ म्हणून घोषित केले आहे.
जिल्ह्यातील रोहयोच्या कामांचा निर्णय आता पालघरमधूनच
By admin | Updated: July 9, 2015 23:26 IST