बी-बियाण्यांच्या नोंदणीसह शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी आता कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:39+5:302021-04-19T04:37:39+5:30
ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व ...

बी-बियाण्यांच्या नोंदणीसह शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी आता कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष
ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व कीटकनाशके आदींचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुरवठ्याच्या मागणीसह त्यात येणाऱ्या समस्या, तक्रारी, अडचणी त्वरित सोडवण्यासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत सुरू करण्यात आले आले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी ठाणे विभागातील शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व उत्पादक, वितरक तसेच कृषी सेवा केंद्र परवानाधारकानी सहकार्य करावे. यापैकी कोणीही कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आणि विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी दिला आहे.
ठाणे विभागात भात पिकाचे प्रमुख क्षेत्र असल्याने ते गुणवत्तापूर्ण भात बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द आहे. त्यासह खते, कीटकनाशक आदींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची मागणी नोंदवण्याकरीता जिल्हा गुणवत्ता व निविष्ठा नियंत्रण कक्ष तैनात केला आहे. ठाणे येथील कोकण विभाग कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी येथे निविष्ठा नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कृषी निविष्ठा पुरवठा नोंदणी करणे, गुणवत्ताबाबत तक्रारी आणि अडचणींची नोंद शेतकऱ्यांना मोबाइलवर कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे किंवा इमेलवर पाठवता येणार आहे. याशिवाय तक्रारी, अडचणींची नोंद निविष्ठा संनियंत्रण कक्षातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनिरुद्ध शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील. ठाणे जि.प. विस्तार अधिकारी डी.बी. जावीर यांच्याकडे शेतकऱ्यांना करता येणार आहे.