‘त्या’ बांधकामांविरोधात आता मनसेही आक्रमक
By Admin | Updated: March 9, 2017 03:03 IST2017-03-09T03:03:16+5:302017-03-09T03:03:16+5:30
केडीएमसीतील २७ गावांमध्ये जोमात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बेसुमार पाणी वापरले जात आहे. मात्र, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने

‘त्या’ बांधकामांविरोधात आता मनसेही आक्रमक
डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमध्ये जोमात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बेसुमार पाणी वापरले जात आहे. मात्र, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने त्याबाबतची तक्रार भाजपाच्या नगरसेविका रविना माळी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु, आयुक्तांनी त्याची दखल घेतलेली नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात उपोषण करण्यासाठी मनसेचा जनहित कक्षही तयार आहे. मात्र माळी यांनी केवळ इशारा देऊ नये तर खरोखरच आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान मनसेने दिले आहे.
मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई यांनी सांगितले, की ‘बेकायदा बांधकामांविषयी भाजपा नगरसेविकेने केलेली तक्रार ही अत्यंत योग्य आहे. बेकायदा बांधकामधारक पाण्याचा सर्रास वापर करीत आहेत. नागरिकांना पाणी मिळत नाही. प्रभागात बेकायदा बांधकामे होत असताना ते रोखण्याची जबाबदारी नगरसेविकेची आहे.
बेकायदा बांधकामांबाबत माळी यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची दखल आयुक्त का घेत नाहीत? त्यांच्या तक्रारीत त्यांना तथ्य का वाटत नाही, असा सवाल मनसेने केला आहे. माळी यांनी १५ मार्चला महापालिकेच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हे आंदोलन जनतेसाठी करावे. त्यांच्या या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असेल. त्यांच्या आंदोलनात मनसेही उतरेल.’
(प्रतिनिधी)
- २७ गावांमधील भोपर, नांदिवली, सागाव, आजदे येथे आजही आठ मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना कोणी परवानगी दिली, हा एक संशोधनाचा विषय आहे. २७ गावांच्या परिसरात सध्या १२०० पेक्षा जास्त बेकायदा इमारतींचे काम सरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारतींचे काम सुरू असताना त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक का करत आहे, असा सवालही मनसेच्या जनहित कक्षाने उपस्थित केले आहे.