कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:52 IST2020-03-18T00:51:59+5:302020-03-18T00:52:20+5:30
बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद
- प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे महापालिकेत राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकतीच केली. अधिसूचनेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे स्पष्ट करत केडीएमसी प्रशासनाने सध्या तरी चुप्पी साधली असली तरी आता या बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मागील पाच वर्षे सुरू असलेल्या २७ गावे वगळण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, २७ मधील १८ गावेच वगळली आणि नऊ गावे महापालिके त शहरीकरण झाल्याच्या मुद्द्यावर जैसे थे ठेवली. या मुद्द्यावर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, त्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता केडीएमसीत किती प्रभाग असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करीत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.
गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ई वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग आय वॉर्डमध्ये होते; परंतु आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा आय वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल तर ई वॉर्डातील गावे महापालिकेत कायम राहिल्याने तो वॉर्ड महापालिकेत कायम राहील.
केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे तसेच नऊ गावे महापालिकेत राहिल्याने आता लोकसंख्या साडेतेरा लाखांपर्यंत राहील, असे जाणकारांचे मत आहे. महसुली हद्दीनुसार ही गावे वगळली आहेत; परंतु जी नऊ गावे महापालिकेत राहिली आहेत, त्यांचे आठ प्रभाग होतील.
विशेष बाब म्हणजे जे आठ प्रभाग आहेत, त्यात वगळलेल्या गावांचेही काही भाग आहेत. १२ लाख लोकसंख्येला ११५ प्रभाग त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्र आणि महापालिकेत राहिलेल्या गावातील लोकसंख्येचा आढावा घेता साधारण ११८ पर्यंत प्रभाग राहतील.
निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत
केडीएमसीत २७ गावांचा समावेश होण्यापूर्वी महापालिकेचे १०१ प्रभाग होते. जून २०१५ मध्ये गावांचा समावेश झाल्यावर प्रभागांची संख्या १२२ इतकी झाली होती. त्या तुलनेत चार प्रभाग कमी झाले असले तरी महापालिकेच्या मूळ १०१ प्रभागांच्या संख्येत मात्र सरकारच्या निर्णयामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.