Notices issued to 'those' workers | ‘त्या’ कामगारांना बजावल्या नोटिसा; हजर झाल्यावर मागवणार खुलासा

‘त्या’ कामगारांना बजावल्या नोटिसा; हजर झाल्यावर मागवणार खुलासा

उल्हासनगर : थांगपत्ता लागत नसलेल्या २६ कामगारांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासनावर वृत्तपत्रात नोटिसा प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. हे कामगार हजर झाल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा व माहिती घेऊन कामावर हजर करून घेण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.

उल्हासनगर महापालिकेत वर्ग १ व २ चे ८० टक्के तर वर्ग ३ व ४ ची ४० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने कामाचा ताण वाढत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दिली. सतत गैरहजर राहत असलेल्या ४७ कामगारांचा प्रश्न एका वर्षांपूर्वी ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन उपायुक्त संतोष देहरकर यांनी कामगारांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला होता. 

त्यापैकी काही कामगारांनी खुलासा व माहिती दिल्यावर त्यांना तसेच काहींच्या वारसाहक्कांना नियमानुसार सेवेत रुजू करून घेतले. यामध्ये कामगार संघटनेने महत्त्वाची भूमिका वठविली. मात्र, राहिलेल्या २६ कामगारांचा प्रश्न अद्याप तसाच असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी दिली. या कामगारांचे खुलासे घेऊन नंतर त्यांना कामावर घेण्याची मागणी केली.

उपायुक्त नाईकवाडे यांनी विभागामार्फत सतत राहत असलेल्या २६ कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवून खुलासा मागितला. 

मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे उघड झाले. अखेर त्यांना महापालिका सेवेतून कमी का करू नये? अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यांच्या नोकऱ्या राहण्यासाठी वृत्तपत्रात त्यांच्याविरोधात नोटिसा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.

Web Title: Notices issued to 'those' workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.