एनए शुल्क भरण्यासाठी नोटिसा
By Admin | Updated: January 25, 2017 04:48 IST2017-01-25T04:48:38+5:302017-01-25T04:48:38+5:30
मीरा-भार्इंदरमधील बहुतांश इमारतींना तहसील कार्यालयाने अकृषिक परवान्यापोटी (एनए) शुल्क जमा करण्याच्या अंतिम नोटीसा

एनए शुल्क भरण्यासाठी नोटिसा
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील बहुतांश इमारतींना तहसील कार्यालयाने अकृषिक परवान्यापोटी (एनए) शुल्क जमा करण्याच्या अंतिम नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांनी राजकीय मंडळींकडे धावाधाव सुरु केली आहे.
मीरा-भार्इंदरमधील अनेक इमारतींचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयात धूळखात आहेत. यामुळे कित्येक इमारतींच्या जागा अद्याप मूळ मालकांच्याच नावे आहेत. अशातच २००९ पूर्वी राज्य सरकारने इमारतीच्या जागेची एनए वसुली पालिकेकडे हस्तांतरित केल्याने ती पालिकेकडून वसूल होणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करुन विकसक वा जागा मालकांचे हित जोपासले गेले. कारण आजही अनेक इमारतींच्या जागेचे सातबारा उतारे मूळ मालकांच्याच नावे आहेत. एनए बाबत अनभिज्ञ असलेल्या रहिवाशांना तहसील कार्यालयाने त्याचे शुल्क भरण्याच्या अंतिम नोटीसा नुकत्याच बजावल्या आहेत.
पालिकेकडे असलेली एनए वसुली २००९ नंतर महसूल विभागाकडे पुर्नहस्तांतरित झाल्याने ९ वर्षांपासून महसूलनेही एनएच्या वसुलीकडे दुर्लक्ष केले. तब्बल ९ वर्षांनी कार्यालयाला जाग आल्याने बहुतांश इमारतींना हजारो व लाखो रकमेच्या अंतिम नोटीसा पाठविल्या आहेत. इमारतींमधील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. हे शुल्क विनाकारण भरावे लागू नये, यासाठी अनेक रहिवासी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)