अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाईची नोटीस कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST2021-09-18T04:43:41+5:302021-09-18T04:43:41+5:30
मीरारोड : मोर्वा येथील श्री राधाकृष्ण मंदिर ट्रस्टने त्यांच्या मालकी जागेत शागीर्द डेकोरेटर्सने बांधलेल्या अनधिकृत गोदाम व मोबाइल टॉवरवर ...

अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाईची नोटीस कागदावरच
मीरारोड : मोर्वा येथील श्री राधाकृष्ण मंदिर ट्रस्टने त्यांच्या मालकी जागेत शागीर्द डेकोरेटर्सने बांधलेल्या अनधिकृत गोदाम व मोबाइल टॉवरवर कारवाईसाठी तक्रारी देऊनसुद्धा महापालिका केवळ नोटीस देऊन बेकायदा कामांना संरक्षण देत असल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी तक्रार केली आहे की, मंदिराच्या सर्व्हे क्रं. ५९ या जागेवर शागीर्द डेकोरेटर्सचे मालक जगदेव म्हात्रे यांनी अनधिकृत गोडाऊनचे बांधकाम करून त्यातील चौदा अनधिकृत खोल्यांना महापालिकेच्या संगनमताने मालमत्ताकर आकारणी करून घेतली आहे. या ठिकाणी चालवले जाणारे बियर शॉप हे ट्रस्टच्या हरकतीने बंद केले. मात्र, येथील अनधिकृत बांधकामवर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाइल टॉवर उभारला असून त्याची नोंद पालिकेकडे नाही. अनेक वर्षांपासून त्याचा कर भरलेला नाही.
मंदिर ट्रस्टच्या तक्रारीनंतर तत्कालीन प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांनी २९ एप्रिल रोजी सदर टॉवर व बांधकाम काढण्याचे आदेश जगदेव म्हात्रे यांना दिले. अन्यथा महापालिका ते बांधकाम काढून त्याचा खर्च वसूल करून एमआरटीपीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. परंतु, म्हात्रे हे बडे ठेकेदार असल्याने पाच महिने होत आले तरी महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.