हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

By Admin | Updated: February 21, 2016 02:41 IST2016-02-21T02:41:07+5:302016-02-21T02:41:07+5:30

नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

Not lost; On the contrary! | हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

हरवले काहीच नाही; उलट बरेच काही गवसले!

- राज चिंचणकर,  ठाणे
नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला.
ज्येष्ठ सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर, अभिनेते प्रशांत दामले व सुबोध भावे, सिनेअभ्यासक गणेश मतकरी, सिनेसमीक्षक अमोल परचुरे यांनी हा परिसंवाद रंगवला. ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक यांनी त्यांना बोलते केले.
नाटकांवरून चित्रपट करणे, ही जुनी परंपरा आहे; पण कालचा सिनेमा व आजचा सिनेमा यात फरक आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ व ‘नटसम्राट’ ही या माध्यमांतराची अलीकडची उदाहरणे आहेत. ही दोन्ही माध्यमांतरे प्रेक्षकांनी उचलून धरली खरी; पण २० व्या शतकात ज्या नाटकांवरून चित्रपट केले गेले, ते चालले नाहीत. नाटक हे शब्दमाध्यम आहे; तर सिनेमा हे प्रतिमामाध्यम आहे, असे मत सुधीर नांदगावकर यांनी मांडले.
नाटकांवर सिनेमा करूच नये, तर कथेवरूनच सिनेमा करावा. कट्यार... हा सिनेमासुद्धा मी नाटकावरून केलेला नाही; तर मी त्या कथेचा सिनेमा केला आहे. या कथेवर मी याआधी नाटकही केले; परंतु पहिल्यापासून मी त्याकडे सिनेमा म्हणूनच पाहत होतो. ते नाटक चालले म्हणून मी त्यावर सिनेमा केलेला नाही, असे भाष्य सुबोध भावे याने केले. जेव्हा सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा बालगंधर्वांनासुद्धा भीती वाटली होती. पण, तसे काही झाले नाही, असेही सुबोध पुढे म्हणाला. माध्यमांतरातून हरवले काहीच नाही; तर गवसलेच असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, नाटकाच्या प्रत्येक प्रयोगातून मला नेहमीच काहीतरी नवीन गवसत गेले आहे. प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. कथेच्या बाबतीत एकाच माणसाचा कंट्रोल असतो; पण नाटकाच्या बाबतीत तसे नसते, अशी भूमिका गणेश मतकरी याने मांडली.

Web Title: Not lost; On the contrary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.