आंदोलक नव्हे, समाजकंटक!
By Admin | Updated: August 13, 2016 03:59 IST2016-08-13T03:59:13+5:302016-08-13T03:59:13+5:30
वेगवेगळ्या कारणांमुळे सतत लोकल वाहतुकीत होणारा खोळंबा, उशिराने धावत असूनही मेल-एक्स्प्रेसना मार्ग काढून देत कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीला

आंदोलक नव्हे, समाजकंटक!
बदलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे सतत लोकल वाहतुकीत होणारा खोळंबा, उशिराने धावत असूनही मेल-एक्स्प्रेसना मार्ग काढून देत कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीला दररोज केला जाणारा विलंब आणि सलग चार दिवस गाड्यांना होत असलेल्या विलंबामुळे-त्याची कोणतीही माहिती दिली जात नसल्याने बदलापूर रेल्वे स्थानकात पहाटेपासूनच संतप्त प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केल्यानंतरही ‘हे आंदोलन समाजकंटकांचे आंदोलन’ असल्याची संभावना रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी केली.
मात्र, हे वक्तव्य कशाच्या आधारावर केले, त्याचा तपशील ते देऊ शकले नाहीत. पण, या आंदोलनाच्या हेतूबद्दलच त्यांनी संशय व्यक्त केला.
पहाटेपासून प्रवाशांनी वाहतूक रोखून धरल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी टिष्ट्वट केल्यावर ओझा बदलापूरला येण्यास निघाले. मात्र, ते पोहोचले तोवर आंदोलनाची धग कमी झाली होती. रेल्वेचे अधिकारी, पोलिसांकडून त्यांनी आंदोलनाबद्दल माहिती घेतली. आंदोलक प्रवाशांचे म्हणणे ऐकले. पण, एकही ठोस आश्वासन ते देऊ शकले नाही. जी कामे सुरू आहेत, त्यांची तीच ती आश्वासने देऊन त्यांनी प्रवाशांची बोळवण केली. लोकल वाहतुकीला उशीर होत असल्याचा प्रवाशांचा आरोपही त्यांनी नाकारला आणि अवघ्या दोनतीन मिनिटे उशिराने गाड्या धावत असल्याचा दावा करत त्यांनी या परिसरातील लाखो प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले. या आंदोलनाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
पहाटेची लोकल नेहमी विलंबाने येते, हा प्रवाशांचा आरोप त्यांनी फेटाळला. गेल्या चारपाच दिवसांत ही लोकल केवळ दोन ते तीन मिनिटे विलंबाने धावल्याचे ते म्हणाले. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने शुक्रवारी ही लोकल २० मिनिटे विलंबाने आली. मात्र, काही लोकांनी आक्रोश करत ही लोकल रोज उशिरा येते, असे म्हणत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर, हे आंदोलन वाढतच गेले. आंदोलनाचे कारणच चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
बदलापूर
गाड्या वाढवा
बदलापूरहून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बदलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांची संख्याही त्या प्रमाणात वाढायला हवी. ही संख्या वाढत नसल्यानेच प्रवाशांचा उद्रेक झाला.
- अश्विनी सावंत, प्रवासी
ठाणे, कल्याणचे
थांबे नको
मुंबईहून बदलापूर आणि कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्यांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांत थांबा देऊ नये. या तिन्ही शहरांतील प्रवासी बदलापूर आणि कर्जत लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांना या गाड्यांत चढता येत नाही.
- शिल्पा पाटकर, प्रवासी
स्थानकातील
गैरसोयी दूर करा
बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. गर्दीच्या वेळी अर्धाअर्धा तास लोकल नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ही गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.
- योगेंद्र कोंडीलकर, विद्यार्थी
अंबरनाथ गाड्या बदलापूरला आणा
बदलापूरकरांची गैरसोय तातडीने थांबवण्यासाठी अंबरनाथहून सुटणाऱ्या गाड्या बदलापूरपर्यंत आणाव्या. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढेल. बदलापूर स्थानकातील ताण कमी होण्यास मदत होईल.
- रिगल गजभी, प्रवासी
उभे राहण्याची
शिक्षा नको
बदलापूर, कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये कमी सीट असलेल्या लोकलचाही समावेश केला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना दोन ते अडीच तास उभे राहून प्रवासाची शिक्षा सहन करावी लागते. ही गैरसोय थांबायला हवी. - सविता दूधवडकर, प्रवासी