उत्तर, दक्षिण भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:49+5:302021-04-03T04:36:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळावे, असे ...

North, South India Express reservation full | उत्तर, दक्षिण भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल

उत्तर, दक्षिण भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळावे, असे आवाहन राज्य, केंद्र सरकार करत असतानाही मुंबईतून उत्तर, दक्षिण भारतात तसेच कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. शाळा-महाविद्यालयांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अगोदरच रेल्वे तिकिटांचे आरक्षण काढले आहे. त्यामुळे आताच मे महिन्यापर्यंतच्या बहुतांशी गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. गावी जाण्याची ओढ असल्याने नागरिक वेटिंगवर तिकिटे काढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे भय कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे तेव्हापासून मेल-एक्स्प्रेस गाड्या सामान्य प्रवाशांसाठी बंद होत्या. त्यामुळे तेव्हा गावाला जाता आले नाही. शिवाय बहुतांशी शाळा बंद आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाइन होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, अनेकांनी यंदा गावी जाण्याचा बेत आखला आहे. त्यातही रेल्वेचा प्रवास तुलनेने स्वस्त आणि वेळ वाचवणारा असल्याने रेल्वेने प्रवास करण्याचा कल अधिक दिसून येत आहे.

सध्याचा उन्हाळा विचारात घेता दिवसा प्रवास करण्यापेक्षा रात्रीच्या प्रवासाला अनेक जण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मुंबईतून रात्री सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरीकडे मागील वर्षी अनेकांनी रेल्वे सुरू नसल्याने रस्ते मार्गाने मिळेल त्या वाहनाने गाव गाठले होते. या खडतर प्रवासाच्या अनेकांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यामुळे या वेळी आधीच आरक्षण करून नियमानुसार कोविड टेस्ट, शक्य झाल्यास लसीकरण आदी करून प्रवास करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

लग्नसराईनिमित्तही प्रवास

- उत्तर भारतातील वाराणसी, लखनऊ, अलाहाबाद, दरभंगा, पाटणा, मुझफ्फर तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे मुंबई येथूनच फुल्ल असल्याचे निदर्शनास येत आहे. या गाड्या एलटीटी, ठाणे, कल्याण, नाशिकमार्गे पुढे धावतात. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एप्रिल - मे हे महिने लग्नसराईचे असल्याने त्याकरिता गावाला जाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

शिमगोत्सवामुळे तिकिटे आरक्षित

- दक्षिण भारतातील मद्रास, तिरुपती, सोलापूरमार्गे हैदराबाद, लातूर आदी ठिकाणी जाण्यासाठीही बुकिंग झाले आहे. कोकणातही रत्नागिरी, कणकवली, गोवामार्गे बंगलोरला जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या शिमगोत्सवासही अनेक चाकरमानी गेले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे.

निवडणुकीमुळेही तिकिटे मिळेनात

सध्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई व परिसरातून अनेक चाकरमानी खास निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मार्चपासूनच या राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत.

--------------

Web Title: North, South India Express reservation full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.