निजामपूर पोलिसांची पालिकेत घुसखोरी
By Admin | Updated: April 1, 2017 05:57 IST2017-04-01T05:57:21+5:302017-04-01T05:57:21+5:30
महापालिकेचा आदेश नसतानाही निजामपूर पोलिसांनी थेट पालिकेच्या जुन्या इमारतीत घुसखोरी केली आहे.

निजामपूर पोलिसांची पालिकेत घुसखोरी
भिवंडी : महापालिकेचा आदेश नसतानाही निजामपूर पोलिसांनी थेट पालिकेच्या जुन्या इमारतीत घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे तेथे काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांची पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कापआळी येथील महापालिकेच्या जुन्या इमारतीत तळ मजल्यावरील वीज विभागाचे कार्यालय रिकामे होते. तसेच अन्य कामगार संघटनेचे कार्यालय आहे. ही जागा पूर्वी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दवाखान्यासाठी मागितली होती. परंतु, त्याबाबत तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विचार केला नाही. दरम्यान, पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी निजामपूर पोलीस ठाण्यासाठी तळ मजल्याची एक हजार स्क्वेअर फूट जागा तात्पुरत्या स्वरूपात लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.
या पोलीस ठाण्यासाठी पर्यायी जागा मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी पालिका व सरकारने प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. पालिकेच्या जुन्या इमारतीतील तळ मजल्यावरील जागा देण्यास प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, हा विषय २७ मार्चच्या महासभेत आला असता सर्वांनी मूक भूमिका घेत या ठरावास मंजूरी दिली. सचिवांनी या ठरावाचे मिनट्सही लिहिलेले नाहीत. तसेच इतिवृत्तास मंजुरी मिळाली नसल्याने प्रशासनाने आदेशही दिले नाहीत. असे असतानाही निजामपूर पोलिसांनी तळ मजल्यावरील जागेचा ताबा घेत आपले कामकाज सुरू केले. (प्रतिनिधी)
पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय
या जागेत प्रभाग समिती क्रमांक-२ च्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे कार्यालय होते. त्यांची महत्त्वाची कागदपत्रे सामानासह बाहेर काढून बेकायदा ताबा घेणे चुकीचे आहे.
आरोग्य विभागास ही जागा रिकामी करून देण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर टेबल मांडून काम करावे लागत आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी दिली.
अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती मान्य
याबाबत, पालिकेचे सहायक आयुक्त सुभाष झळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. पुढील कारवाईसाठी आपण लेखी अहवाल उपायुक्तांमार्फत आयुक्तांकडे पाठवणार असल्याचे सांगितले.