निलय पट्टेकर दुहेरी यशाच्या उंबरठ्यावर; अंतिम लढतीत मिळवलं स्थान
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 16, 2023 15:10 IST2023-10-16T15:10:04+5:302023-10-16T15:10:13+5:30
खेतवानी स्मृती ठाणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

निलय पट्टेकर दुहेरी यशाच्या उंबरठ्यावर; अंतिम लढतीत मिळवलं स्थान
ठाणे : बूस्टर अकॅडमीच्या निलय पट्टेकरने सहज विजय मिळवत सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट आयोजित खेतवानी स्मृती ठाणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील १३ आणि १५ वर्ष वयोगटाच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले. आज हा सामना रंगला होता.
सीकेपी सोशल क्लबच्या सभागृहात सुरु असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसरे मानांकन मिळालेल्या निलयने दुसऱ्या मानांकित प्रो टेबल टेनिस अकॅडमीच्या एकांश मदनेचे आव्हान सहज परतवून लावले. हा सामना निलयने ११-३,११-१, ११-५ अशा फरकाने जिंकला. या गटातील अन्य लढतीत अग्र मानांकित प्रो टेबल टेनिस अकॅडमीच्या प्रतीक तुलसानीने बिगर मानांकित आपला संघ सहकारी अनय गोळेवर ११-३, ११-१, ११-५ असा विजय मिळवला. १५ वर्ष वयोगटाच्या निर्णायक लढतीत निलय समोर बूस्टर अकॅडेमीच्याच तनिष पेंडसेचे आव्हान असेल. निलयने चिवट झुंजीनंतर एस टेबल टेनिस अकॅडेमीच्या खुश पाटीलचे आव्हान ८-११,११-५, ११-६, ११-९ असे परतवून लावले. तनिषने प्रतीक तुलसानीवर ११-६,११-७, १२-० असा विजय मिळवत निर्णायक लढतीत स्थान मिळवले.