नालासोपारा (मंगेश कराळे) : प्रगती नगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नायजेरियन तरुणाची तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री सुमारे पावणे अकरा वाजता रोशन अपार्टमेंटसमोरील मोनु किराणा अँड जनरल स्टोअर्स येथे आरोपी ओघाने इग्री (४७) आणि ऑडिओ पेक्युलियर (५०) हे दोघे आपसात बोलत होते. त्या वेळी लकी उइजेह (३२) हा तिथे आला आणि त्यांच्या संभाषणात मध्ये बोलला.
या कारणावरुन तिघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. आरोपी आयुला बर्थलोमी (५०) याने लकीवर काचेच्या बाटलीने वार केला, तर ओघाने इग्री आणि ऑडिओ पेक्युलियर यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये लकी उइजेह गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपी ओघाने इग्री आणि ऑडिओ पेक्युलियर यांना अटक केली असून, आयुला बर्थलोमी फरार आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत. दरम्यान, या हत्येच्या घटनेमुळे प्रगती नगर परिसरातील नायजेरियन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.