नववर्षाचे कल्याणला कार्यक्रम
By Admin | Updated: March 22, 2017 01:30 IST2017-03-22T01:30:27+5:302017-03-22T01:30:27+5:30
‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत प्लॅस्टिकमुक्तीसाठी जागृती

नववर्षाचे कल्याणला कार्यक्रम
कल्याण : ‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत प्लॅस्टिकमुक्तीसाठी जागृती केली जाणार आहे. बाइक रॅलीमधून त्याबाबत संदेश देणार आहे. तसेच याज्ञवल्क्य संस्था वर्षभर साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार आहे, अशी माहिती याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त राजीव जोशी यांनी सांगितले.
नववर्ष स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद झाली. याज्ञवल्क्य संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त स्वागतयात्रेच्या प्रायोजकात्वचा मान संस्थेला दिला आहे. या वेळी याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, उपाध्यक्ष सुधाकर दिवेकर, कल्याण संस्कृती मंचाचे संस्थापक डॉ. सुरेश एकलहरे व अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
जोशी म्हणाले, की सामाजिक सलोखा हे ब्रीदवाक्य घेऊन शहरातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व ज्ञाती संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापौर, आयुक्त, कल्याणचे आमदार आणि खासदार यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कलाकार, नगरसेवक या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत.
मराठी शाळाकडे पालकांचा ओढा राहिलेला नाही. यासाठी मराठी शाळेचे महत्त्व सांगणारा चित्ररथ सुभेदारवाडा शाळेतर्फे साकारण्यात येणार आहे. तरुणांनी स्वागतयात्रेत सहभागी व्हावे यासाठी मराठी शाळांना स्वागतयात्रेत येण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)