ठाण्यात नववर्ष यात्रेचा जल्लोष मर्यादित स्वरूपात; महिलांचा सहभाग लक्षणीय
By Admin | Updated: March 29, 2017 05:19 IST2017-03-29T05:19:13+5:302017-03-29T05:19:13+5:30
श्री कौपिनेश्वर मंदिरापासून पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार प्रस्थान झाले. सुरूवातीला पालकमंत्री एकनाथ शिंदे व

ठाण्यात नववर्ष यात्रेचा जल्लोष मर्यादित स्वरूपात; महिलांचा सहभाग लक्षणीय
ठाणे : श्री कौपिनेश्वर मंदिरापासून पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार प्रस्थान झाले. सुरूवातीला पालकमंत्री एकनाथ शिंदे व स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे पालखीचे भोई झाले होते. पालखी व इतर पादचारी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे आले. चिंतामणी चौक येथे पालखी आल्यावर ‘स्वयंभू संस्कृती’ ढोलताशा पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन या पालखीचे रुपांतर स्वागतयात्रेत झाले. ही स्वागतयात्रा पुढे गजानन महाराज चौक-हरीनिवास सर्कल येथे आल्यावर श्री कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीवर पालकमंत्री शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे व खा. राजन विचारे यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी सहभागी ठाणेकरांनी ‘हर हर महादेव’, ‘कौपिनेश्वर महाराज की जय’ असा नारा दिला. तसेच, शंखही फुंकण्यात आले. त्यानंतर विष्णूनगर येथे पालखी आल्यावर या ठिकाणी ‘आम्ही ठाणेकर’ या ढोल ताशा पथकाने पालखीला मानवंदना देत सादरीकरण केले. त्यानंतर घंटाळी चौकात ‘रणगर्जना प्रतिष्ठान’ने मानवंदना दिली. यात प्रथमच सादर केलेला बर्ची हा प्रकार ठाणेकरांच्या पसंतीस पडला. स्वागतयात्रा घंटाळी चौक-गोखले मार्ग-समर्थ भांडारपर्यंत आल्यावर पुढे राम मारुती रोड-पु.ना.गाडगीळ चौक-तलावपाळीमार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात समाप्त झाली. स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ््यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. कोणी टाळ तर कोणी लेझीम सादर केले. ठाणे महापालिकेचा ब्रासबॅण्डही यात सहभागी होता.
लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण यात्रेत सहभागी झाले असले तरी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भगवा फेटा, नऊवारी साडी, नथ अशा वेशभूषेत बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला. रीना राजे आणि गौरी राजे या मायलेकींनी आपल्या बाईकवर पाळणा लावून ‘पाळणा बोलतोय’ अशा प्रकारची केलेली सजावट लक्ष वेधून घेणारी होती. सरस्वती क्रीडा संकुलाने दरवर्षीप्रमाणे जिम्नॅस्टीकचे सादरीकरण केले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला. सारा फाऊंडेशनने चित्ररथामध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ तर विश्वास गतिमंद संस्थेने ‘फुलपाखरु’ हा विषय सादर केला. आदर्श मैत्री प्रतिष्ठानतर्फे सहभागी झालेल्या मुलांनी हातात पाटी घेऊन ‘मराठी शाळा वाचवा’चा संदेश दिला. विविध राज्यांचे पोशाख परिधान करुन काही महिला बाईकवर स्वार झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
मॅक्सीकोच्या क्रिस्तीनाने लुटला स्वागतयात्रेचा आनंद : मेक्सीकोतून आलेल्या क्रिस्तीना कोपेल या महिलेने या स्वागतयात्रेचा मनमुराद आनंद लुटला. ठाणे फिरण्यासाठी आलेली ही महिला एका ठाणेकर डॉक्टरांसह आली होती. ते तिला या स्वागतयात्रेची माहिती देत होते. क्रिस्तीनाने आपल्याला स्वागतयात्रा खूप आवडली असून मेक्सीकोला गेल्यावर आप्तेष्टांना स्वागतयात्रेचे फोटो दाखविणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे एकत्र येऊन सण साजरा करणे, ही संकल्पनाच खूप छान असल्याचेही ती म्हणाली.
सायकलवरून आलेल्या आजोबांसोबत सेल्फीसाठी गर्दी : खोपट येथे राहणारे ७८ वर्षीय देविदास ठोंबरे हे सायकलवरून स्वागतयात्रेत येताच बघ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. या आजोबांभोवती जमून अनेकांनी त्यांची माहिती घेतली व त्यांच्यासोबत सेल्फी काढले. आजोबांचा उत्साह हा तरुणाईला लाजवणारा होता. आतापर्यंत मी १९ सायकली बदलल्या असून, माझी ही वेशभूषा मी स्वत: तयार केल्याचे ते म्हणाले.
मान्यवरांची उपस्थिती
सभागृहनेते नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, आ. रवींद्र फाटक, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडस, अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती व इतर, तसेच न्यासाचे पदाधिकारी स्वागतयात्रेत सहभागी झाले होते.
स्वागतयात्रेतील चित्ररथ स्पर्धेचा निकाल
प्रथम - वनवासी कल्याण आश्रम
द्वितीय - सारा फाऊंडेशन
तृतीय - विहंग चॅरिटेबल ट्रस्ट / रोटरी क्लब आॅफ ठाणे
उत्तेजनार्थ १ - पर्यावरण दक्षता मंडळ
उत्तेजनार्थ २ - भगिनी निवेदिता मंडळ
उत्तेजनार्थ ३ - महिलांची बाईक रॅली