कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळलेल्या रुग्णास दोन चाचण्यानंतर सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 20:10 IST2021-01-06T20:08:33+5:302021-01-06T20:10:21+5:30
Corona News : ब्रिटनवरून भारतात २१ डिसेंबर रोजी आलेली ३२ वर्षीय व्यक्तीने स्वतःची चाचणी करून घेतली नव्हती.

कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळलेल्या रुग्णास दोन चाचण्यानंतर सोडणार
मीरारोड - ब्रिटनवरून मीरारोडमध्ये आलेल्या ३२ वर्षीय व्यक्तीच्या कोरोना चाचणीत नवीन स्ट्रेनचे विषाणू सापडल्याने त्याला १४ दिवस अलगीकरणात ठेऊन २४ तासांच्या अंतराने दोन चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्या व्यक्तीला सोडले जाणार आहे.
ब्रिटनवरून भारतात २१ डिसेंबर रोजी आलेली ३२ वर्षीय व्यक्तीने स्वतःची चाचणी करून घेतली नव्हती. तसेच महापालिकेला सुद्धा कल्पना दिली नव्हती. मीरारोडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची माहिती २६ डिसेंबर रोजी महापालिकेला समजल्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याचे घर गाठले आणि कोरोना चाचणी केली. त्याच्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांना रामदेव पार् मधील कोविड केअरमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान त्या व्यक्तीच्या चाचणीचे नमुने पुण्याच्या पाठवले असता त्याच्या अहवालात कोरोना विषाणूंचा नवीन स्ट्रेन आढळून आला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नीस अन्य रुग्णांपासून लांब वरच्या मजल्यावर स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांच्या अलगीकरणानंतर २४ तासांच्या अंतराने त्यांची दोन वेळा चाचणी केली जाणार आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना घरी सोडले जाणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.