नवा रस्ता ४५ वर्षानंतर होणार
By Admin | Updated: June 29, 2017 02:37 IST2017-06-29T02:37:28+5:302017-06-29T02:37:28+5:30
ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे.

नवा रस्ता ४५ वर्षानंतर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे. यासाठी ४८ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजूर केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका हा पाच किलोमीटरचा रस्ता शहरातून जातो. १९७० च्या दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्त्याची वारंवार दुरूस्ती करावी लागत असल्याने तत्कालीन सरकारने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवला.
यंत्रमाग उद्योग वाढल्याने या रस्त्यावरील जडवाहनांची वर्दळ वाढली. १९९२ च्या दरम्यान हा रस्ता नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला. पालिकेने आजतागायत या रस्त्यासाठी कोट्यवधी खर्चूनही रस्त्यामधील चढउतार कमी करता आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी साठेआठ कोटी खर्चून पुन्हा हा रस्ता बनवण्यात आला.
मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराने पुन्हा या मार्गावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. तसेच रात्रीच्यावेळी नारपोली व शहर वाहतूक पोलीस अवजड वाहने या शहरातील रस्त्यावरून पाठवत असल्याने त्याचा परिणामही रस्त्यावर होत होता. मात्र याबाबत पालिका प्रशासन व नगरसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तर महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे काम करता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरून नियमित जाणाऱ्या नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी वाढल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी ४८ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर केल्याने नव्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहे.