कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर नवीन रोपे

By Admin | Updated: December 22, 2016 05:38 IST2016-12-22T05:38:07+5:302016-12-22T05:38:07+5:30

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते.

New plants on the Kalyan-Dombivli parallel road | कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर नवीन रोपे

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर नवीन रोपे

कल्याण : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. परंतु, देखभालीअभावी ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावरील रोपे मरून गेली होती. याबाबत, ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत तेथे केडीएमसीने पुन्हा झाडांची नवीन रोपे लावली आहेत. सध्या या झाडांचे संवर्धन प्रशासनाकडून केले जात आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चालू वर्षात सव्वा लाख झाडे लावण्याचा संकल्प केडीएमसीने केला आहे. वृक्षारोपणाच्या विशेष मोहिमेत महापालिकेबरोबरच विकासक, सामाजिक संस्था, मंडळे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, ज्येष्ठ नागरिक संस्था यांना वृक्षांची रोपे पुरवण्यात आली. रोपांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी याच संस्थांवर महापालिकेने टाकली आहे.
उंबर्डे, बारावे, बल्याणी, नेतिवली टेकडी, डोंबिवली एमआयडीसी, २७ गावे, रस्त्यांलगत, महापालिका शाळा, महापालिकेची उद्याने, मैदानांमध्ये महापालिकेने वृक्षलागवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वृक्षारोपण करणाऱ्या व देखभाल करणाऱ्या संस्था, विकासकांना ट्री गार्ड्सवर स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर ट्री गार्ड्समध्ये लावलेली रोपे सुकून गेली होती. या रस्त्याच्या दुभाजकावर विकासकांनी गुजरात, हैदराबाद येथून आणलेली पाम ट्री लावली आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रस्त्याला एक झालर प्राप्त झाली होती. मात्र, रस्त्याकडील ट्री गार्ड्समधील झाडे सुकल्याने या रस्त्याची शोभा गेली होती. महापालिका आणि संबंधित सामाजिक संस्थांचे या झाडांच्या देखभालीकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढवली होती. वृक्षारोपण करताना मोठ्या प्रमाणावर फोटोसेशन झाले. मात्र, लावलेल्या झाडांची निगा राखायची कोणी, असा सवाल वास्तव पाहता उपस्थित झाला होता.
अखेर उशिरा का होईना, केडीएमसी प्रशासनाला जाग आली आहे. समांतर रस्त्यावर सुकलेल्या झाडांच्या जागेवर नव्याने झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांबरोबर अन्य काही झाडांना खतपाणी घालून संवर्धन केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New plants on the Kalyan-Dombivli parallel road