ठाणे : कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने ठाणे महापालिकेने आता उत्पन्नाचे नवनवे पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुने स्मार्ट पार्किंग धोरण फाइलबंद करून आता नवीन धोरण अमलात आणण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या धोरणामुळे रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागणार आहे. वाहतूककोंडी कमी होण्याबरोबर मनपाच्या तिजोरीत वर्षाकाठी कोट्यवधींचा निधी जमा होईल, असा दावा मनपाने केला आहे. नवीन धोरणासाठी मनपाला कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. यासंदर्भातील प्रस्ताव १९ मेच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने ठामपाने आठ वर्षांपूर्वी स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यातून शहरातील १७७ रस्त्यांवर ९,८५५ वाहने उभी करण्याची सुविधा मिळणार होती. रस्त्यांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करून वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार होते. मनपाला या योजनेसाठी १८ कोटींचा खर्च करावा लागणार होता. तर कंत्राटदार उत्पन्नातील काही वाटा मनपाला देणार होता. या कामाकरिता १५ वर्षांसाठी निविदा काढली होती. त्यास महासभेनेही मंजुरी दिली होती; परंतु निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ती रद्द करण्यात आली.
नवीन पार्किंग धोरणाचा, ठाणे महापालिकेला आधार; वर्षाकाठी मिळणार कोट्यवधींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 10:13 IST