शहापूरमध्ये नव्याने सेंटर झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:19+5:302021-04-19T04:37:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुक्यातील जोंधळे कॉलेजमध्ये गेल्यावर्षी पहिल्या कोविड सेंटरची सुरुवात झाली होती. या सेंटरमध्ये १०० ...

New center started in Shahapur | शहापूरमध्ये नव्याने सेंटर झाले सुरू

शहापूरमध्ये नव्याने सेंटर झाले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : शहापूर तालुक्यातील जोंधळे कॉलेजमध्ये गेल्यावर्षी पहिल्या कोविड सेंटरची सुरुवात झाली होती. या सेंटरमध्ये १०० रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथे सोय करण्यात आली होती. नंतर मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार केले जाऊ लागले. त्याचा मोठा फायदा तालुक्यातील कोरोना रुग्णांना झाला. या कोविडे सेंटरमुळे जरी फायदा झाला असला तरी येथे अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला होता.

जे साहित्य वापरात आले ते जाळून टाकण्याची गरज होती. याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, आम्हाला जे जाळण्याच्या सूचना करण्यात आल्या ते साहित्य आम्ही जाळले, मग आता उर्वरित साहित्य अजूनही या गोदामामध्ये पडून का आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये गाद्या, उश्या, पलंग व इतर साहित्य पडून आहे. लोखंडी पलंगाचा पुनर्वापर करता येऊ शकेल. या कोविड सेंटरमध्ये तब्बल १०० कर्मचारी काम करीत होते. त्यामध्ये सात ते आठ डॉक्टर होते. त्यांना ३० हजार रुपये इतका पगार दिला जात होता. नर्स यांना २० हजार रुपये तर इतर कामगारांना ४०० रुपये रोज असा पगार दिला जात होता. अगदी वेळेवर यापैकी निम्याहून अधिक जणांचा केवळ कोविड काळात वापर केला गेला. हे सेंटर बंद झाल्यावर मात्र त्यांना सरकारी प्रमाणपत्र दिले आणि कामावरून काढून टाकले.

आज तालुक्यात पुन्हा एकदा १६० रुग्णांसाठी गोठेघर आश्रम येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने मागीलवर्षी काम करणाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. मग याआधीच्या सेंटरमधील यंत्रणा येथे उपलब्ध होत नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तेथे असणारे साहित्य येथे आणल्याचे प्रशासन सांगत असले तरी सर्वच साहित्याबरोबर आहे की काही चोरीला गेले आहे का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तालुक्यात कोरोना महामारीचे संकट हळूहळू ओसरू लागल्याचे असं वाटल्यानंतर हे कोविड सेंटर बंद करण्यात आले. या सेंटरचा प्रत्यक्षात शहापूर तालुक्यातील नव्हे तर मुरबाड व कल्याण, ठाणे परिसरातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा नक्कीच झाला. यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. आज दुसऱ्या लाटेमध्ये शहापूर तालुक्यातील वातावरण पूर्णपणे चिंतामय बनले असून, आता याच कॉलेजच्या ऐवजी शहापूर गोठेघर आश्रमशाळा येथे तब्बल १६० रुग्णांसाठी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सेंटरमध्ये शहापूर तालुक्यामध्ये वाढत असलेले अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत असून, यांच्यावरती दिवस-रात्र येथे उपचार केले जात आहे. यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. याच सेंटरचे काम सुरू असून, आता जवळजवळ सेंटरमधील सर्वच खाटा पूर्ण भरल्याची माहिती प्राप्त होत आहे.

खर्च जिल्हा प्रशासनाने केला

मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरवर किती खर्च करण्यात आला याविषयी या सेंटरचे प्रमुख मनोहर बनसोडे यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, यासाठी खर्च जिल्‍हा प्रशासनाने केला.

Web Title: New center started in Shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.