राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
By Admin | Updated: June 29, 2017 02:47 IST2017-06-29T02:47:56+5:302017-06-29T02:47:56+5:30
मीरा- भार्इंदरमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी व वरिष्ठांच्या नाराजीने अखेर नवनियुक्त

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी व वरिष्ठांच्या नाराजीने अखेर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांना राजीनामा द्यायला लावला. पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता पाहता पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पाटील हे आपल्या समर्थकांसह पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये जाण्याचे निश्चित झाले आहे. आधी झालेली नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पळापळ, मेंडोन्सांचा सेना प्रवेश यामुळे नावापुरती उरलेल्या राष्ट्रवादीतील ही तिसरी फूट ठरणार आहे. पालिका निवडणुकीत गणेश नाईक व संजीव नाईक यांना भोपळा सुध्दा फोडता येणार नाही असे चित्र आहे.
मीरा- भार्इंदरमधील राष्ट्रवादीची जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर सोपवली आहे. वास्तविक पाटील हे तसे मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसचे स्थानिक नेते मुझफ्फर हुसेन यांच्याशी पटत नसल्याने ते मेंडोन्सांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रवादीत दाखल झाले. मेंडोन्सा यांनी पाटील यांना सभागृहनेते व उपमहापौर पदही दिले. परंतु २०१२ च्या निवडणुकीत पाटील यांचा दारुण पराभव झाला.
मेंडोन्सा यांनी पराभव घडवून आणल्याचा समज करत त्यांच्यावर पाटील यांनी खापर फोडले. तेव्हापासून ते मेंडोन्सा यांच्या विरोधात होते. मेंडोन्सा हे सेनेत जाणार याची खात्री झाल्याने राष्ट्रवादीतील काही निष्ठावंतांनी पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद घेण्याची गळ घातली. माजी मंत्री नाईक यांनीही पाटील यांना पद घेण्याचे आवाहन केले.
निवडणुकीच्या तोंडावर असताना पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पद घेतल्यावर त्यांना पक्षबांधणी त्वरित करता आली नाही. शिवाय त्यांनी शहरातील प्रश्न हाती घेऊन पक्षातील उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे अपेक्षित होते. त्यातच महिला जिल्हाध्यक्षपदी रजनी गुप्ता यांची नियुक्ती तर युवा जिल्हाध्यक्षपदी साजीद पटेल यांना बाजूला काढून आझाद पटेल यांच्या नियुक्तीची शिफारस पाटील यांनी केली. पण वरिष्ठां कडून मंजुरी मिळाली नाही. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. शिवाय कार्यकारिणी निवडीवरूनही एक गट नाराज झाला. त्यांनी त्याची तक्रार थेट नाईक यांच्यापासून प्रदेशस्तरावर केली. निरीक्षक सोनल पेडणेकर यांच्याशीही पाटील यांचे बिनसले.
पाटील यांनी आम्हाला विश्वासात न घेताच परस्पर वादग्रस्त नियुक्तीसाठी खटाटोप चालवल्या प्रकरणी नाईक यांनी नाराज गटाची बाजू उचलून धरली. त्यामुळे पक्षाचा मेळावाही पाटील यांना गुंडाळावा लागला. इच्छुकांच्या यादी तयार करण्यावरूनही खटके उडाले. नाईक यांनी यादी मागवली असता ती देण्यात आली नाही. दुसरीकडे पाटील यांच्यासह आणखी एक पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले सुरेश दळवी यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
दरम्यान, निरीक्षक दिनकर तावडे यांनी पाटील यांची भेट घेतली. परंतु सकारात्क निर्णय न झाल्याने तावडे यांनीही पाटील यांच्या विरोधात अहवाल तयार केला. पक्षातून पाटील यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. पाटील यांना त्याची कल्पना असल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुझफ्फर हुसेन हे सध्या रूग्णालयात दाखल असल्याने काँग्रेस प्रवेशाचा सोहळा लवकरच होणार आहे. पाटील यांचे चिरंजीव देखील काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.
बविआ- शिवसेना युतीची अफवा
मीरा रोड : पालिकेत भाजपा, शिवसेना व बविआची युती असली तरी यंदा मात्र बहुजन विकास आघाडीकडून शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावच आलेला नाही. केवळ भाजपासोबतच बोलणी सुरू आहे. तर बविआचा नगरसेवक असलेल्या ठिकाणी शिवसेनेकडेही उमेदवार असल्याने बविआ - शिवसेना युती केवळ अफवाच असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपाने बविआसाठी तीन जागा सोडल्या होत्या. बविआचे मोहन जाधव व सेनेच्या निलम ढवण सोबत युतीने लढून विजयी झाले होते.
यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह शिवसेनेसोबतही बोलणी सुरू असल्याचा दावा बविआच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने केला होता. परंतु बविआ नेतृत्वाची मात्र केवळ भाजपासोबत बोलणी सुरू असल्याचे समजते. आमदार मेहता हे स्वत: आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटायला जाणार होते. त्यामध्ये युतीबद्दल निर्णय अपेक्षित असला तरी भाजपाकडून बविआला दोन अंकी जागा देखील सोडल्या जाणार नाहीत हे वास्तव आहे. त्यातच मेहतांनी नगरसेवक भोईर दाम्पत्यास भाजपात घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
बविआचे नगरसेवक मोहन जाधव यांचा आताचा जो नवीन प्रभाग झाला त्याच भागातील काँग्रेस नगरसेवक दिनेश नलावडे व राजेश वेतोस्कर हे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे सेनेशी युती करायची म्हटली तरी जाधव यांना उमेदवारी शक्य नाही.
तर भोईर दाम्पत्य नगरसेवक असलेला प्रभाग देखील आता थेट पेणकरपाड्याला जोडल्याने त्यांना सुध्दा बविआच्या शिट्टी खाली निवडून येण्यासाठी भाजपा किंवा शिवसेनेचा पर्याय निवडावा लागणार आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आमदार नरेंद्र मेहतांवरील प्रेम हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे ते भाजपासोबतच राहणार.