राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

By Admin | Updated: April 1, 2017 05:48 IST2017-04-01T05:48:59+5:302017-04-01T05:48:59+5:30

भिवंडीत भाजपाच्या आघाडीला तोंड देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या

NCP will fight on your own? | राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

दीपक देशमुख / वज्रेश्वरी
भिवंडीत भाजपाच्या आघाडीला तोंड देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू असले, तरी या आघाडीत नेमका किती वाटा मिळेल, याबाबत संभ्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही स्वबळाची चाचपणी सुरू आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यासाठी भाजपाने विविध पक्षातील अनेक नेत्यांसाठी गळ टाकला आहे. विधानसभा, कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे महापालिकेत ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना हाताशी धरून भाजापाने आपले बळ वाढवले, तसा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण
राष्ट्रवादीचे घोडे वरिष्ठ पातळीवर अडल्याने आघाडी होणार नाही, हे गृहीत धरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे.
९० नगरसेवक असलेल्या पालिकेत यंदा प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने त्यादृष्टीने राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू आणि महिला अध्यक्ष स्वाती कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले असून १३१ इच्छुकांनी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. सध्या पालिकेत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक असून त्यापैकी तीन जणांनी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपात प्रवेश केला आहे.
तर राष्ट्रवादीनेही समाजवादीचा एक विद्यमान नगरसेवक आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह शहरातील समाजसेवक, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात घेतले आहे. यात महिलावर्गाचा मोठा समावेश आहे.
असे असले तरी अंतर्गत कलहाचा मोठा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. पक्षातील एक गट गुड्डू यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षाकडे ठोस असा कोणताच कार्यक्र म नाही. त्यामुळे मतदारांपुढे तेच तेच मुद्दे घेऊन जाणार असल्याने मतदार राष्ट्रवादीला किती स्वीकारतील हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्यात समाधानाची बाब अशी की राष्ट्रवादीने एक खंबीर धडाडीची महिला शहर अध्यक्ष दिल्याने गेल्या वर्षभरापासून त्यांनी महिलांच्या अडचणी सोडविल्या असल्याने महिला वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊन पक्षात प्रवेश केला आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी होण्याची शक्यता नाही. त्यात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसही एकत्र येण्याची चिन्हे नसल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान सेक्युलर मते विभागण्याचे आहे. भाजप शिवसेनेपेक्षा काँग्रेस, समाजवादी हेच राष्ट्रवादीचे मोठे विरोधक या निवडणुकीत असणार आहे. मात्र, सध्या राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसची झालेली अवस्था पाहता राष्ट्रवादीची स्थिती भिवंडीत चांगल्यापैकी आहे. यामुळेच जवळपास २० ते २२ नगरसेवक हमखास निवडून येतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आघाडीबाबत आमचे बोलणे सुरु असून सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. मुख्य समस्या रस्ता, पिण्याचे शुद्ध पाणी हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादीने दिवसरात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदार नक्कीच आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देतील. पक्षात नाराज कुणी नाही. असल्यास त्यांची समजूत काढू.
-खालिद गुड्डू,
भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

आम्ही नेहमी महिलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनाधार आहे. शहरातील महिला गोडाऊनमध्ये कामाला जातात. त्यांच्यासाठी लघुउद्योग स्थापन करण्यावर आमचा भर असेल.
- स्वाती कांबळे, महिला शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: NCP will fight on your own?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.