गटबाजी वाढल्यानेच राष्ट्रवादीला अपयश
By Admin | Updated: September 1, 2016 03:10 IST2016-09-01T03:10:59+5:302016-09-01T03:10:59+5:30
ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण

गटबाजी वाढल्यानेच राष्ट्रवादीला अपयश
ठाणे : ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण हेच कारण असल्याचे उद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले व स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना उद्देशून निरंजन डावखरे यांनी पक्षात समन्वयाची गरज आहे, असा टोला लगावला होता. ‘समन्वय प्रतिष्ठान’ ही आव्हाड यांची सामाजिक संस्था असून परांजपे यांना आव्हाड यांनीच पक्षात आणल्याने ते त्यांचे निकटवर्तीय ओळखले जातात. त्याचा संदर्भ देण्याकरिताच डावखरे यांनी ‘समन्वय’ या शब्दाचा खुबीने वापर केला व त्यावर कार्यकर्त्यांमध्येही सूचक हशा पिकला.
नेमकी हीच बाब हेरून अजित पवार यांनी नेत्यांचे कान टोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीत वसंत डावखरे हे तीन वेळा विजयी झाले. मात्र, या वेळी त्यांचा पराभव झाला, याचा उल्लेख करीत पवार यांनी त्यालाही पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
पालिका निवडणूक जिंकायची असेल तर गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सल्लाही पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)
टक्केवारीमुळे शाई धरण रखडले
ठाणेकरांना शाई धरण बांधले गेले असते, तर मुबलक पाणी मिळाले असते. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्या कामात ५ टक्के हवे असल्याने हे धरण रखडले, असा आरोप जितेंद्र आव्हाड व गणेश नाईक यांनी केला. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा खर्च वाढून २२०० कोटींवर गेल्याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.