जिल्ह्यात एनसीसीचे युनिट उभारणार - भामरे
By Admin | Updated: February 13, 2017 04:56 IST2017-02-13T04:56:02+5:302017-02-13T04:56:02+5:30
स्थानिक मुलांना लष्करी आणि नौदलाचे शिक्षण मिळावे, यासाठी एनसीसीचे युनिट ठाणे जिल्ह्यात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

जिल्ह्यात एनसीसीचे युनिट उभारणार - भामरे
शहापूर : स्थानिक मुलांना लष्करी आणि नौदलाचे शिक्षण मिळावे, यासाठी एनसीसीचे युनिट ठाणे जिल्ह्यात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शुक्रवारी येथील आगरी महोत्सवात केली.
आगरी क्र ांती समाज प्रतिष्ठानतर्फे येथील गुजरातीनगरमध्ये आयोजित आगरी महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
आगरी समाज उत्सवप्रिय असून कोणताही सण, उत्सव तो उत्साहाने साजरा करतो. महाराष्ट्रातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी आपल्या संस्कृतीशी आपली नाळ टिकवून असतो. तरु ण पिढीला आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा यांची ओळख व्हावी, त्याबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी अशा महोत्सवाची नितांत गरज सांगून आजचा महोत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असल्याबद्दल त्यांनी कौतुकास्पद उद्गार काढले.
आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करून महोत्सव भरवण्यामागचा उद्देश थोडक्यात सांगितला. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी आगरी समाजात होत असलेल्या हळदी आणि लग्न समारंभातील वारेमाप खर्चाला आळा घालण्याची गरज असल्याचे सांगून सामाजिक प्रबोधन एका दिवसात होत नसून ते सातत्याने करावे लागते, असे सांगितले.
खा. कपिल पाटील यांनी सांगितले की, सर्व समाजाला एक विचार देण्यासाठी विचारांचा महोत्सव भरवला पाहिजे आणि या महोत्सवामधून एक सामाजिक विचार दिला पाहिजे. मुरबाडचे आ. किसन कथोरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, माजी आ. दौलत दरोडा, आ. पांडुरंग बरोरा, कल्याणचे आ. नरेंद्र पवार, दशरथ तिवरे यांनी थोडक्यात विचार मांडले. या वेळी आगरीसेनाप्रमुख राजाराम साळवी, कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, धनवर्धिनी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गुजराथी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, भाजपाचे ठाणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे, राजाभाऊ पातकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)