नायब तहसीलदार आयसीयूमध्ये
By Admin | Updated: October 27, 2015 00:19 IST2015-10-27T00:19:13+5:302015-10-27T00:19:13+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले.

नायब तहसीलदार आयसीयूमध्ये
ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले. त्यानंतर, ते बडबडत असतानाच खाली पडले असता
त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार केले.
सध्या पनवेल येथील न्यू लाइफलाइन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण, कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असून ताणतणाव व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. तिची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
या घटनेआधीदेखील आस्थापना विभागातील अव्वल कारकून मोहन दरेकर यांनी आत्महत्या केली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याचे सांगितले जात आहे.
त्या पत्राची प्रत मिळावी, यासाठी ठाणे जिल्हा महसूल लिपीक कर्मचारी संघटनेने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली आहे. पण, सुमारे चार महिने होऊन संबंधितांना मृत्यूपूर्वीचे पत्र मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तर्कवितर्कास उधाण आले आहे.