लसीकरणात ठाणेसह नवी मुंबईची आघाडी तर उल्हासनगर, भिवंडी पिछाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST2021-05-05T05:06:11+5:302021-05-05T05:06:11+5:30
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे लसीकरण केंद्र बंद करून ...

लसीकरणात ठाणेसह नवी मुंबईची आघाडी तर उल्हासनगर, भिवंडी पिछाडी
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे लसीकरण केंद्र बंद करून प्रत्येक शहरात फक्त एक लसीकरण केंद्र सुरू ठेवले आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात फक्त १५ हजार ६४० लसींचा साठा शिल्लक असून केवळ १२ लाख ३४ हजार ५६८ जणांचे जिल्हाभरात लसीकरण झाले आहे. यात ठाणेसह नवी मुंबई आघाडीवर असून उल्हासनगर, भिवंडी पिछाडीवर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरणासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी केल्यामुळे लसींचा तुटवडा झाला आहे. जिल्ह्यातील २५८ लसीकरण केंद्रांपैकी प्रत्येक शहरात केवळ एक केंद्र सुरू ठेवण्याचा प्रसंग ओढावला आहे. सहा महापालिकांमध्ये फक्त सात लसीकरण केंद्र व पाच तालुक्यांच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे अवघे सात केंद्र सुरू आहे. सध्या ठिकठिकाणी फक्त १५ हजार ६४० लसींचा साठा शिल्लक असून यामध्ये कोविशिल्डच्या आठ हजार ९१० व सहा हजार ७३० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.
स्मार्ट सिटीच्या ठाणे शहरात सर्वात कमी म्हणजे कोविशिल्डचा ४० लसी आणि कोव्हॅक्सिनच्या ८० लसींचा साठा शिल्लक आहे. ठाण्यात केवळ एक लसीकरण केंद्र सुरू आहे. या शहरातील तीन लाख सहा हजार ३७ ठाणेकरांनी लसीकरण केले आहे. यामध्ये ६४ हजार ३८१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत कोव्हॅक्सिनच्या ७७० कोविशिल्डच्या ६३० लसींचा साठा आहे. मीरा-भाईंदरला चार हजार ७६० तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये तीन हजार ५६० लसीचा साठा आहे. कल्याण-डोंबिवली शहरात एक हजार ४८० लस आहेत. उल्हासनगरला दोन हजार ४८० लस शिल्लक आहेत. भिवंडीला एक हजार ८४० लस आहेत.
आतापर्यंत कोणत्या शहरात किती जणांचे लसीकरण
१) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात- १,९४,९७९
२) केडीएमसी - १,७५,२७४
३) उल्हासनगर - ३६,६०६
४) भिवंडी - ३५,०८१
५) ठाणे मनपा- ३,०६,०३७
७) मीरा-भाईंदर- १,९५,४०४
८) नवी मुंबई - २,८८,०९५
------------------